मुंबई

संकट काळात आता ITI चे विद्यार्थी ठरणार ‘रक्षक’; २ लाख तरुणांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे मोफत प्रशिक्षण

मुंबई: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) विद्यार्थ्यांना आता आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देऊन ‘सज्ज’ केले जाणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने राज्यातील ४१९ शासकीय आयटीआयमधील सुमारे २ लाख विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाईल. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी ‘कौशल्य विकास विभाग’ आणि ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.
​नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, कोणत्याही आपत्तीच्या वेळी तातडीने बचावकार्य करण्यासाठी तरुणांचा सहभाग वाढवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक माहिती न देता, प्रत्यक्ष मैदानी प्रात्यक्षिके आणि बचावकार्याचे तंत्र शिकवले जाणार आहे. विशेष म्हणजे, हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य असून यामुळे प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती निवारणासाठी प्रशिक्षित तरुणांची एक मोठी फौज उपलब्ध होणार आहे.
​मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले की, ज्याप्रमाणे आपण फिट इंडिया आणि योग दिनासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देतो, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन हे देखील देशसेवेचेच एक माध्यम आहे. शहरातील आग किंवा ग्रामीण भागातील पूर यांसारख्या विविध संकटांचा अभ्यास करून हा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आयटीआयचे विद्यार्थी आता केवळ नोकरीसाठीच नाही, तर समाजसेवेसाठीही तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *