बोलावं तर लागेलच

स्टंट की स्टेटस? पालक कुठे चुकतात? — तज्ज्ञांचे परखड मत

स्वप्निल दुधारे – मुंबई:अलीकडील काळात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणांकडून धोकादायक बाईक स्टंट्स करण्याच्या घटना वाढत आहेत. “स्टंट की स्टेटस, आणि पालक कुठे चुकतात?” या विषयावर महासागर डिजिटल चैनल वर चर्चासत्राचा आयोजन करण्यात आलं होतं.
या चर्चासत्राचे सूत्रसंचालन महासागर डिजिटल चे संपादक स्वप्निल दुधारे यांनी केलं.या आयोजित चर्चासत्रात महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, दैनिक महासागरचे समूह संपादक संदीप काळे, नवी मुंबईच्या पोलीस मित्र विजया कदम, पुण्यातील वरिष्ठ पत्रकार आशिष तिवारी तसेच प्राचार्य प्रशांत बुक्कावार सहभागी झाले होते. या चर्चेतून अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे पुढे आले.

कायदा आणि शिस्त यावर प्रवीण दीक्षित यांचे भाष्य

माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी स्पष्ट केले की, बाईक स्टंट्स हा केवळ वैयक्तिक धोक्याचा विषय नसून तो सार्वजनिक सुरक्षेचाही प्रश्न आहे. रस्त्यावर स्टंट करणे हे कायद्याने गुन्हा असून यामुळे निरपराध नागरिकांचाही जीव धोक्यात येतो. केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी नसून पालक आणि समाजानेही जबाबदारी घेतली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

माध्यमांची भूमिका – संदीप काळे

दैनिक महासागरचे समूह संपादक संदीप काळे यांनी सांगितले की, सोशल मीडियावरील व्हायरल संस्कृतीमुळे तरुणांमध्ये “लाईक्स” आणि “फॉलोअर्स” मिळवण्याची स्पर्धा वाढली आहे. काहीवेळा माध्यमांमधून अशा घटनांचे अतिरेकी चित्रण होते, ज्यामुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो. सकारात्मक आदर्श निर्माण करणे ही माध्यमांची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

समाज आणि पालकांची जबाबदारी – विजया कदम

नवी मुंबईच्या पोलीस मित्र विजया कदम यांनी सांगितले की, अनेकदा पालक मुलांना महागड्या बाईक्स देतात, पण त्यांना वाहतूक नियम आणि सुरक्षिततेचे शिक्षण देण्यात कमी पडतात. मुलांशी संवादाचा अभाव ही मोठी समस्या आहे. वेळोवेळी मार्गदर्शन आणि नियंत्रण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सोशल मीडियाचा प्रभाव – आशिष तिवारी

वरिष्ठ पत्रकार आशिष तिवारी यांनी नमूद केले की, सोशल मीडियावर “स्टेटस” टिकवण्यासाठी तरुण धोकादायक कृत्ये करतात. मित्रमंडळींमध्ये वेगळेपण दाखवण्याची मानसिकता आणि प्रसिद्धीची लालसा यामुळे स्टंट्सची प्रवृत्ती वाढते. या मानसिकतेवर काम करण्यासाठी शाळा, पालक आणि समाज यांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.

शैक्षणिक दृष्टीकोन – प्राचार्य प्रशांत बुक्कावार

प्राचार्य प्रशांत बुक्कावार यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाहतूक सुरक्षिततेबाबत जनजागृती कार्यक्रम राबवण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांना शिस्त, जबाबदारी आणि कायद्याचे भान लहानपणापासून दिले पाहिजे. पालकांनी मुलांच्या ऑनलाईन क्रियाकलापांवरही लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या चर्चासत्रातून स्पष्ट झाले की, “स्टंट की स्टेटस” हा केवळ तरुणांचा प्रश्न नसून तो कुटुंब, समाज, माध्यमे आणि प्रशासन या सर्वांचा आहे. केवळ कारवाई नव्हे तर योग्य मार्गदर्शन, संवाद आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे.धोकादायक स्टंट्सपेक्षा सुरक्षितता आणि जबाबदारी हेच खरे “स्टेटस” आहे, असा एकमताचा सूर या चर्चेत उमटला.
या कार्यक्रमात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल हे सहभागी होणार होते पण वरिष्ठांच्या महत्वपूर्ण बैठकीमुळे त्यांना सहभागी होता आलं नाही.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *