नागपूर मौदा

हळदी-कुंकवाला जाताना काळाची झडप, दोन बहिणींचा दुर्दैवी अंत

मौदा :- नागपूर-भंडारा महामार्गावर शनिवारी दुपारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. महालगावनजीक असलेल्या नाग नदीच्या पुलावर एका वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मामे-आते बहीण असलेल्या दोन तरुण महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिशा अनिकेत मेहर (२६, रा. भुगाव, ता. कामठी) आणि तिची मामे बहीण मोनाली दिनेश्वर घाटोळे (२७, रा. तायगाव खैरी, ता. सौसर) या दोघी शनिवारी दुपारी २:४५ च्या सुमारास अॅक्टिव्हा गाडी क्रमांक एम.एच.४०- बी.एम.२९५५ ने भुगाव येथे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जात होत्या. महालगावजवळील नाग नदीच्या पुलावर मागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

ही धडक इतकी जोरदार होती की, दोघीही गंभीर जखमी झाल्या. या अपघातात अलिशा मेहर यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोनाली घाटोळे यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात नेले जात असताना, दुर्दैवाने वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली,

हसत्या-खेळत्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
अलिशा या मूळच्या पिपळा डाक बंगला येथील रहिवासी असून सात महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. तर मोनाली हिचा येत्या २६ फेब्रुवारीला विवाह निश्चित झाला होता. लग्नाची खरेदी आणि तयारी सुरू असतानाच काळाने झडप घातल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *