टॉप स्टोरी मुंबई

होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडून कच्च्या तेलाचे जहाज मुंबईत सुरक्षित दाखल

मुंबई, दि. १२ प्रतिनिधी:अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध अद्यापही सुरू आहे. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराण हादरले आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेलाच्या जहाजांची वाहतूक विस्कळीत झाल्याने जागतिक पातळीवर कच्चे तेल व गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

‘शेनलॉग’ (सुएझमॅक्स) नावाचे लायबेरियन ध्वज असलेले हे टँकर सौदी येथून १,३५,३३५ मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन आले. मध्य पूर्वेतील (West Asia) तणाव वाढल्यानंतर या महत्त्वाच्या जलमार्गातून सुरक्षितपणे भारताकडे पोहोचलेली ही पहिली मोठी तेलाची खेप ठरली आहे. प्रादेशिक तणाव वाढल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनी मार्गे होणाऱ्या तेल वाहतुकीबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर ‘शेनलॉग’चे सुरक्षित आगमन भारतासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी: ‘जगाचे तेलवाहतुकीचे हृदय’
जगभरातील तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला जलमार्ग म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी. या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमधून कच्च्या तेलाच्या जहाजांच्या वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे याचा परिणाम जगातील अनेक देशांवरही होत आहे. यामध्ये भारतालाही या युद्धाचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. मात्र, असं असतानाही होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून कच्च्या तेलाचे एक जहाज मुंबईच्या बंदरावर सुरक्षितपणे दाखल झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या दरम्यान लायबेरियाचा ध्वज असलेले एक जहाज कच्चे तेल घेऊन होर्मुझची सामुद्रधुनी पार करून थेट मुंबईच्या बंदरात सुरक्षितपणे दाखल झाले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माहितीनुसार, सौदी अरेबियामधील एका बंदरावरून कच्चे तेल वाहून नेणाऱ्या ‘शेनलॉग सुएझमॅक्स’ या जहाजाला बुधवारी इराणने जलमार्गातून जाण्याची परवानगी दिल्यानंतर ते मुंबईत पोहोचले आहे.

सामुद्रधुनीचे जागतिक महत्त्व:
होर्मुझ सामुद्रधुनीतून दररोज सुमारे २० ते २१ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आणि उत्पादनांची वाहतूक केली जाते. अमेरिकेच्या ऊर्जा माहिती प्रशासनाच्या माहितीनुसार, २०२२ मध्ये या मार्गावरून दररोज सरासरी २१ दशलक्ष बॅरल तेल वाहून नेले गेले, जे जगातील एकूण कच्च्या तेलाच्या व्यापाराच्या सुमारे २१ टक्के आहे. OPEC (ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज) सदस्य असलेले सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमिराती, कुवैत आणि इराक हे देश बहुतांश याच सामुद्रधुनीतून आशियाकडे कच्च्या तेलाची निर्यात करतात. याशिवाय, जगभरात पुरवला जाणारा एक तृतीयांश द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG) देखील याच जलमार्गातून निर्यात होतो. म्हणूनच होर्मुझ सामुद्रधुनीला ‘जगाचे तेलवाहतुकीचे हृदय’ असे म्हटले जाते.

भौगोलिक स्थिती आणि नियंत्रण:
होर्मुझ सामुद्रधुनीच्या उत्तरेला इराण आणि दक्षिणेला ओमान व संयुक्त अरब अमिराती हे देश आहेत. ही सामुद्रधुनी उत्तरेकडील पर्शियन आखाताला दक्षिणेकडील ओमानच्या आखाताशी जोडते आणि त्यानंतर ती अरबी समुद्रात विलीन होते. या सामुद्रधुनीची लांबी सुमारे १६१ किलोमीटर आणि रुंदी सर्वात अरुंद भागात फक्त ३३ किलोमीटर आहे. कोणत्याही वेळेस या मार्गावरून डझनभर तेलवाहू जहाजे ये-जा करीत असतात.

संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय समुद्र कायद्यानुसार, प्रत्येक देशाला त्याच्या किनारपट्टीपासून १२ नॉटिकल मैल (सुमारे १३.८ मैल) पर्यंतचा भाग नियंत्रित करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ असा की, होर्मुझ सामुद्रधुनीचा सर्वात अरुंद भाग पूर्णपणे इराण आणि ओमानच्या क्षेत्रामध्ये येतो. यामुळे या सामुद्रधुनीवरील नियंत्रण आणि प्रवेशाबाबत इराण आणि ओमान यांच्याकडे मोठे अधिकार आहेत. याच गोष्टीमुळे इराणकडून वेळोवेळी या मार्गावरील वाहतूक थांबवण्याची धमकी दिली जाते. या सामुद्रधुनीअंतर्गत इराण त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात कारवाई करू शकतो, पण परदेशी जहाजांच्या प्रवासाचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही, असे विश्लेषकांनी सांगितले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *