मुंबई प्रतिनिधी:अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या १२ नगरसेवकांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या सर्व १२ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस पक्ष कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी दिली.
गेल्या महिन्यात अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. मात्र, नगरपालिकेत बहुमत नसल्याने भाजपने सत्तेसाठी काँग्रेस नगरसेवकांना सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन केला . पक्षाला अंधारात ठेवून भाजपशी सलगी करण्याच्या स्थानिक नेतृत्वाच्या कृतीची गंभीर दखल घेत काँग्रेसने बुधवारी १२ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली.
पक्षाच्या या कारवाईनंतर १२ नगरसेवकांनी आज नवी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर काँग्रेसने १२ नगरसेवकांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र गट स्थापन करणे किंवा नंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे हे अनैतिक तर आहेच पण असंवैधानिकही आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच सर्वांना कायदेशीर नोटीसा बजावण्यात येतील,असे सचिन सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये प्रदीप नाना पाटील, दर्शना उमेश पाटील, अर्चना चरण पाटील, हर्षदा पंकज पाटील, तेजस्विनी मिलिंद पाटील, विपुल प्रदीप पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजवणी राहुल देवडे, दिनेश गायकवाड, किरण बद्रीनाथ राठोड आणि कबीर नरेश गायकवाड यांचा समावेश आहे.




