टॉप स्टोरी महाराष्ट्र

*२०४७ च्या विकसित महाराष्ट्राची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प – महसूल मंत्री बावनकुळे*

मुंबई दि. ६ :मुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा केवळ आकडेवारीचा दस्तऐवज नसून वास्तवाची जाणीव ठेवत २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्याचा प्रगतीशील, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवक, उद्योग तसेच ग्रामीण आणि नागरी भागाच्या विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायम ठेवण्याच्या घोषणेमुळे राज्यातील कोट्यवधी शेतकरी बांधव आणि महिलांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी नमूद केले.

३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात आली आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांना न्याय देणारा असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या चौफेर विकासाची सर्वसमावेशक मांडणी या अर्थसंकल्पात करण्यात आली असून ग्रामीण विकासासोबतच नागरी भागातील सर्व घटकांचा विकास साधण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. सन २०४७ पर्यंत राज्यातील सुमारे ७० टक्के लोकसंख्या नागरी भागात राहणार असल्याचे लक्षात घेऊन राज्यात दहा ठिकाणी नागरी शहरी विकास प्राधिकरणे स्थापन करण्यासोबतच एक हजार लोकसंख्या असलेली गावे कॉंक्रिट रस्त्यांनी जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.

थोर समाजसुधारकांच्या स्मरणार्थ येणारे वर्ष “सामाजिक समता व समरसता वर्ष” म्हणून साजरे करण्याची घोषणा ही सामाजिक जाणीवेची महत्त्वपूर्ण बाब असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी नमूद केले. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संसदीय कारकिर्दीची दखल म्हणून “गतिमान नागरी सेवा पुरस्कार” देण्याची घोषणा ही त्यांना वाहिलेली आदरांजली असल्याचे त्यांनी सांगितले.

पायाभूत सुविधा, रोजगार, उद्योग, शेतीविकास, ग्रामविकास, ऊर्जा, विमानतळे, रस्ते, मेट्रो, रेल्वे वाहतूक विकास, प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विकसित पर्यटन, परवडणारी घरे, तिसरी मुंबई, रामटेकजवळ तिसरी चित्रपट नगरी, नवीन नागपूर, विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सवलती, स्टार्टअपला प्रोत्साहन, आरोग्य सुविधा, सांस्कृतिक वारसा संवर्धन, क्रीडा गुणवत्ता विकास केंद्रे, शासनात ७५ हजार नवीन पदभरती, नागरिकांच्या मालमत्ता हक्कांचे संरक्षण, स्मार्ट पोलिसिंग, महसूल व्यवस्थेचे आधुनिकीकरण, सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरण, पर्यावरण संरक्षण तसेच मुद्रांक अधिनियमातील सुधारणा अशा विविध निर्णयांमुळे हा अर्थसंकल्प वेगवान आणि लोकाभिमुख सरकारची दिशा दर्शवणारा असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प राज्यातील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल, असा विश्वास व्यक्त करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
——-

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *