महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. २ :केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये शुक्रवार, दि. २ जानेवारी रोजी सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण करण्यात आले. अंकुर सिड्सच्या सौजन्याने उपलब्ध झालेल्या या सुविधेचे उद्घाटन अंकुर सिड्सचे अध्यक्ष रवी काशीकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी नितीन गडकरी, कांचन गडकरी, अंकुर सिड्सचे व्यवस्थापकीय संचालक माधवराव शेंबेकर, संचालक मकरंद सावजी, संचालक दिलीप रोडी, विजयी भारत संस्थेचे सचिव प्रभाकर येवले, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
२७ जुलै २०२५ ला डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन झाल्यानंतर सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील रुग्णांना एमआरआय, सिटी स्कॅन, डायलिसिस, एक्स-रे, पॅथॉलॉजी, जेनेरिक औषधांच्या सुविधांचा जवळपास दहा हजार रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये आता सोनोग्राफीच्या सुविधेची देखील भर पडली आहे.
अत्याधुनिक व स्वदेशी असलेल्या या मशीनद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने गुणवत्तापूर्ण चाचण्या होणार आहेत. ही सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहे. रवी काशीकर यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात योगदान देता आले, याचा आनंद असल्याची भावना व्यक्त केली.
नितीन गडकरी यांनी यावेळी अंकुर सिड्सच्या व्यवस्थापनाचे आभार मानताना अधिकाधिक गरीब रुग्णांना या सुविधेचा लाभ देण्याचा प्रयत्न असेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रतिमा रोडी, सारंग गडकरी, मधुरा गडकरी, अविनाश घुशे, अतुल मंडलेकर, प्रकाश टेकाडे, हेमंत गडकरी, दिलीप धोटे, संजय टेकाडे, दर्शन पांडे यांच्यासह स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. मनीष केडिया, डॉ. पराग मुन, डॉ. बन्सल, डॉ. आस्था खेमका, डॉ. रोहित बडगे, डॉ. अभिजित ढवळे यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले.




