नागपूर, दि.7 :राष्ट्रीय विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय यांच्या निर्देशान्वये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूरचे अध्यक्ष दिनेश पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 14 मार्चला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये ही लोक अदालत होणार आहे. पक्षकारांनी आपली प्रलंबीत व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीसाठी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लोक अदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर व वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालये तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार न्यायालये व औद्योगिक न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, ग्राहक तकार निवारण मंच आणि इतर सर्व न्यायालये तसेच न्यायाधिकरणे येथे होणार आहे.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई, भुसंपादन मामले, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघणार आहे. लोक अदालतीमध्ये वाद मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ञ वकिल व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकारास मदत करतील.
लोक अदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. लोक अदालतीच्या निवाडयाविरूध्द अपील नसल्याने वाद कायमचा मिटतो. न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोक अदालतीमध्ये होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. खटल्यामध्ये साक्षी पुरावा, उलट तपासणी, दिर्घ युक्तीवाद याबाबी टाळल्या जातात. वाद मिटविल्याने वेळ व पैशाची बचत होते. तसेच प्रकरण न्यायालयात चालविण्याकरीता होणाऱ्या त्रासातुन सुटका होते व त्वरीत आपसी संमतीने न्याय मिळतो. पक्षकारांनी आपली प्रकरणे दिनांक 14 मार्चला आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्याकरीता प्रलंबित प्रकरणासाठी संबंधित न्यायालयात अर्ज सादर करावा आणि दाखलपूर्व प्रकरणासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूरचे सचिव प्रविण मो. उन्हाळे व नागपूर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रोशन बागडे यांनी केले आहे.





