भारतात को एकेकाळी कम्युनिस्ट पक्षाची चलती होती. तेलंगणा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, बिहार आणि इतर अनेक राज्यांत कम्युनिस्ट पक्षाचे चांगलेच प्रस्थ होते. त्यांच्या कामगार संघटना बलाढ्य होत्या. १९६२ साली चीनने आक्रमण केले त्या दिवसापर्यंत कम्युनिस्ट पक्ष एकसंध होता. चिनी अक्रमणाचा निषेध करण्याच्या मुद्द्यावर पक्षांतर्गत मतभेद झाले आणि कम्युनिस्ट पक्षाची शकले झाली. आक्रमण करणाऱ्या चीनला समर्थन देणारे डाव्यातील डावे कम्युनिस्ट आणि चीनचा विरोध करणारे उजवे कम्युनिस्ट असे २ गट पडले.
आज मुद्दाम नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की, आपल्या केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी कम्युनिस्ट चीनचे हुकूमशहा राष्ट्रपती शी जिनपिंग यांची निवड झाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. जिनपिंग निव्वळ तिसऱ्यांदा राष्ट्रपती झालेले नाहीत. तर त्यांनी मरेपर्यंत त्याच पदावर चिकटून राहण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. चीनला समृद्ध बनवण्याच्या दिशेने आपण जे प्रयत्न केलेले आहेत, ते वाखाणण्याजोगे आहेत, असे विजयन यांनी म्हटले आहे. भारताबरोबर नेहमीच खोड्या करणारा हा चीनचा राष्ट्रपती विजयन यांना आदर्श वाटतो. जिनपिंग यांचा आवाज जागतिक राजकारणात बुलंद होईल, असेही आपल्या संदेशात सांगणारा भारतातील एका राज्याचा मुख्यमंत्री कसा डोळे मिटून भारताविरुद्ध गुन्हेगारी काड्या करणाऱ्या जिनपिंग याची पिंगपिंग किती मोलाची आहे, हे सांगून कम्युनिस्टांचे खरे दात दाखवून दिले आहेत.
जो चीन आपल्या अरुणाचलवर दावा सांगतो, जो चीन सीमेवर अतिक्रमण करतो, जो चीन भारताविरोधी पाकिस्तानला वाटेल तेवढी मदत करतो, त्या चीनच्या राष्ट्रपतीला मुजरा करणारा पिनराई याला कोण देशभक्त म्हणणार? चीनमध्ये पाऊस पडला की आपल्या देशात छत्र्या उघडणारे हे तथाकथित देशभक्त भारताचे खाऊन ज्याचे गुण गातात तो आपला परमशत्रू आहे, हे मान्य करायला तयारच नाहीत. मार्क्सने सांगितलेले वार्गविहिन, राज्यविहिन समाजाचे स्वप्न जगात कुठेही दिसत नाही.
रशिया आणि चीन या एकेकाळच्या दोन कम्युनिस्ट राष्ट्रांपैकी कुठेही सत्तेवर असलेले नेते हुकूमशहा होते. त्यांनी क्रूरपणे आपल्या विरोधकांना तारण्याचेच काम केले होते. आता रशियातून कम्युनिस्ट पक्ष हद्दपार झालेला असला तरी त्या देशाचे राष्ट्रपती पुतीन हुकूमशाही मार्गानेच चालले आहेत. जिनपिंग हे तर भारताविरुद्ध काड्या करणाऱ्या नेत्यांना गोंजारण्याचेच काम करतात. जगातील एकमेव कम्युनिस्ट राष्ट्र असणाऱ्या चीनला लाभलेला जिनपिंग नावाचा राष्ट्रपती मुळात पाशवी वृत्तीचा आहे, हे अनेकदा दिसून आले आहे. दुसरी महत्वाची बाब अशी की, तोंडात मैत्रीची भाषा आणि मागाहून पाठीवर वार असे या जिनपिंगचे धोरण आहे. अशा या भारताच्या अखंडतेला नख लावणाऱ्या चीनच्या राष्ट्रपतीचे अभिनंदन करणारे केरळचे मुख्यमंत्री देशभक्त आहेत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. विजयन यांचा निषेध केलाच पाहिजे. कम्युनिस्ट पक्षाचे हे अजब तर्कट कोणाही देशभक्ताला सहन होण्यासारखे नाही.