राज्यातील सर्वच महानगरपालिकांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली असली, तरी पहिल्याच तासात निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दरम्यान, आज मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांमध्ये दुपारी २ वाजेपर्यंत सरासरी २८ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी आली होती. दुपारनंतर मतदानाला वेग येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सायंकाळपर्यंत मतदारांचा प्रतिसाद दिसून आला नाही.
मतदानाची अंतिम आकडेवारी हाती आली नसली तरी नागपूर ५१.२३ टक्के, मुंबई ५१.०८%, नवी मुंबई ५४%, उल्हासनगर ४४ %, भिवंडी ४८%, मीरा भार्इंदर ४८%, वसई विरार ५५%, पनवेल ५४%, नाशिक ४९%, मालेगाव ५६%, धुळे ४६%, जळगाव ४४%, अहिल्यानगर ५६%, पुणे ४६%, पिंपरी चिंचवड ५०%, सोलापूर ५०%, कोल्हापूर ५८%, सांगली मिरज ५१%, छ. संभाजीनगर ५३%, नांदेड ५२%, लातूर ५३%, परभणी ५७%, अमरावती ५१%, अकोला ५३%, चंद्रपूर ४८%, इचलकरंजी ५६%,, जालना ५५, ठाणे ५३ आणि कल्याण डोंबिवली ४८ टक्के असे मतदान झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, आयोगाने यापूर्वी घेतलेल्या एकामागून एक निर्णयांमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असतानाच, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच मोठ्या प्रमाणावर गैरव्यवस्थेचे चित्र समोर आले. अनेक ठिकाणी मतदार यादीतील नावांचा गोंधळ, ईव्हीएम मशीन बंद पडणे, बटणे काम न करणे अशा तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटींमुळे मतदारांची मोठी हेळसांड झाली.
निवडणूक आयोगाच्या या ढिसाळ कारभाराचा पहिला फटका वनमंत्री गणेश नाईक यांनाच बसला. नवी मुंबईत सकाळी मतदानासाठी बाहेर पडलेल्या गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबाला एक तास मतदान केंद्रांवर फिरावे लागले.
दोन वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर नाव न सापडल्याने संभ्रम निर्माण झाला. अखेर कोपरखैरणे येथील सेंट मेरी हायस्कूलच्या मतदान केंद्रावर गणेश नाईक, संजीव नाईक आणि सून कल्पना नाईक यांची नावे यादीत आढळली. मात्र, माजी महापौर सागर नाईक आणि त्यांच्या पत्नीचे नाव वेगळ्याच ठिकाणी असल्याचे समोर आले. नेहमी एकाच ठिकाणी मतदान करणाºया नाईक कुटुंबाला वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर जावे लागले.
या प्रकारावरून यंत्रणा टू द पॉइंट काम करत नसल्याचा गंभीर आरोप गणेश नाईक यांनी केला. केवळ नवी मुंबईच नव्हे, तर मीरा-भाईंदरमध्येही मतदानाच्या सुरुवातीपासून गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. मतदानाबाबत पुरेशी जनजागृती न झाल्याने अनेक मतदारांना आपले मतदान केंद्र नेमके कुठे आहे, याचीच माहिती नसल्याचे दिसून आले. परिणामी मतदार केंद्र शोधण्यासाठी इकडून तिकडे फिरताना दिसले.
नागपूरच्या प्रभाग क्रमांक २८ मधील आराधना नगर येथील जीआरके कॉन्व्हेंटमधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुमारे ४० मिनिटे मतदान थांबले होते.
मशीन बदलल्यानंतरच मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये मतदानाची सुरुवातच बंद किंवा बिघडलेल्या मशीनमुळे झाल्याने, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका होत आहे.
सोलापूरमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली. संगमेश्वर पब्लिक स्कूलमधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे सकाळी साडेसातपासून मतदान प्रक्रिया थांबली होती. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र जवळपास पाऊण तासानंतरच मशीन सुरू होऊ शकली.
छत्रपती संभाजीनगरमध्येही मतदानाच्या सुरुवातीलाच गोंधळ उडाला. गुजराती कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ते दुरुस्त करण्यास जवळपास एक तास लागला. या काळात नागरिकांना मतदान केंद्रावर ताटकळत उभे राहावे लागले. मुंबईतही मतदान केंद्रांवर गोंधळाची दृश्ये दिसून आली.
कुर्ला पूर्व येथील कामगार नगरमधील पंत वालालवकर शाळेतील मतदान केंद्रावर मतदारांची नावे, मतदान केंद्र आणि बूथ बदलल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला.
राजकीय पक्षांच्या पेंडॉलमध्ये ईव्हीएम मशीनचे डेमो
नागपूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २३, गरोबा मैदान, नालंदा चौक या ठिकाणी राजकीय पक्षांच्या पेंडॉलमध्ये ईव्हीएम मशीनचे डेमो लपवून ठेवले होते. हा प्रकार लक्षात येताच संबंधित कर्मचाºयांनी डेमो मशीन जप्त केल्या. याप्रकरणी अपक्ष उमेदवार मुकेश मधुकर मेश्राम यांनी निवडणूक अधिकारी यांना लेखी तक्रार दिली.
भाजपाचे आमदार मोहन मते यांच्या दक्षिण नागपूर मतदार संघात जवळपास १५० मतदारांची नावे गहाळ झाल्याचा आरोप करण्यात आला. मतदार वणवण भटकत होते. विधान सभा मतदार संघ निहाय नावे शोधा,असे येथील पदाधिकारी सांगत होते.




