छत्रपती संभाजीनगरची दंगल कशी पेटली?

मुंबई, दि.१९। वृत्तसंस्था राम नवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरातील किराडपुरा भागात दंगलीवर बुधवारी विधिमंडळ अधिवेशनात चर्चा झाली. त्यात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्या दिवशी नेमके काय घडले, पोलिसांनी स्थिती कशी हाताळली, हे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी त्यांना अभयही दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या भागात दंगल घडली तिथे अल्पसंख्यक समुदायाची लोकसंख्या जास्त आहे. तिथेच राम मंदिर आहे. वर्षोनुवर्षे त्या मंदिरात राम नवमी साजरी केली जाते. त्यामुळे राम नवमीच्या आदल्या दिवशी उशिरापर्यंत मंदिर सुरु असते. भाविक त्याठिकाणी येतात. दंगल घडली त्यावेळी सुरवातीला ३ जण तिथे गेले.

परत जाताना त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर परिस्थिती शांत झाली. पण ६ जण तिथे पुन्हा आले. त्यावेळी त्यांना मंदिर बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ते परत गेले. पण त्याचवेळी मंदिरात २०० ते २५० जण दबा धरून बसल्याची अफवा पसरवण्यात आली. हे लपलेले लोक आपल्यावर हल्ला करणार असल्याची खोटी माहिती पसरवली गेली. या अफवेनंतर तिथे मोठा जमाव जमला. प्रत्यक्षात मंदिरात कुणीही नव्हते. पोलिस यंत्रणाही जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते.फडणवीस पुढे म्हणाले की, पण पुन्हा तिथे जमाव जमला. घटनास्थळी विटाचा ढीग होता. पोलिसांनी अखेरपर्यंत जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्हीकडून पोलिसांवर दबाव येत होता. या घटनेत काही पोलिस कर्मचारीही जखमी झालेत. अखेर स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळे पोलिसांनी रबर बुलेट चालवल्या. माझ्याकडे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *