परवा मणिपूर राज्यातील मारामारीनंतरचा एक नवीन एपिसोड दिसून आला. आपल्या देशात महिलांचा आदर करण्याची परंपरा आहे. पण ही परंपरा आता दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे काय, असा संशय घेण्यास जराही मन कचरत नाही. दररोज मनाला वेदना देणाऱ्या बलात्काराच्या त्याच त्याच घटना फक्त त्या नावाचा बदल करून प्रकाशित करणे ही वर्तमानपत्राची जणू काही गरज बनली आहे. आम्हाला तर असे वाटते की, आता प्रत्येक वर्तमानपत्राने ‘भारतातील आजचे बलात्कार’ नावाचे सदर सुरू करावे म्हणजे आपण किती खालच्या थरावर गेलो आहोत याचे दुःखदर्शन घडेल.
महाभारताच्या काळात दुर्योधनाने दु:शासनाला आपल्या कुटुंबाच्या सुनेचे कपडे फेडण्याचा आदेश दिला होता. त्या काळात कृष्ण असल्यामुळे दुर्यो धनाचे दुष्ट कारस्थान तडीस जाऊ शकले नाही आणि मग महाभारताच्या युद्धात ‘ दु’शासनाचा अंत झाला. आता कृष्ण नसल्यामुळे गावागावात आणि शहरा- शहरात असे प्रकार सर्रास सुरू आहेत. मणिपूरच्या मात्रागमनी हरामखोरांना पोलिसांनी पकडले. त्यांना पकडल्यावर आता मणिपूरच्या या घटनेबद्दल पंतप्रधान व्यथित झाल्याचे आम्ही वाचले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या राज्यात जो नंगानाच चालू होता त्याबद्दल देशाचे पंतप्रधान मौन बाळगून आहेत, हा संदेश मनाला वेदना देणारा आहे.
एका लहानशा राज्यातील दंगल भारताच्या बलाढ्य अशा पोलीस यंत्रणेला आणि सैन्याला थांबवता येत नसेल तर त्यामागची कारणमीमांसाही आपण जाणून घेतली पाहिजे. ही दंगल थांबली पाहिजे, असे त्या राज्यातील सरकारला वाटले असते तर गेल्या ३-४ महिन्यापासूनचा भयपट थांबला असता. त्या राज्यात जे चालू आहे, त्यामुळे आपल्या देशाची प्रतिमा जगभरात मलीन होत आहे, याचे भान तरी आपल्याला आहे काय? सभ्य समाजात अशा प्रकारच्या घटनांना स्थान राहू शकते काय? पूर्वी युद्धात एखाद्या राजाचा हरवल्यावर त्या राजपरिवारातील स्त्रियांना मनाला हेलावून टाकणारी वागणूक मिळत असे. आता आधुनिक जगात अशा प्रकारच्या कृत्यांना थारा नाही. असे असले तरी मणिपुरात जे घडले ते केवळ त्या राज्यालाच नव्हे, तेथील एका विशिष्ट समाजालाच नव्हे, तर देशाला कलंकित करणारे आहे.
ज्या आरोपीला पकडण्यात आले आहे, त्याच्यावर कारवाई होईल. पण आपल्या देशातील न्याय यंत्रणा आणि त्या न्याय यंत्रणेला वाटेल तसे वागवणारे कायदेतज्ज्ञ हे प्रकरणही इतके दिवस लांबवू शकतात की त्यानंतर जनतेला या घटनेचा विसरही पडू शकतो. ज्या बिचाऱ्या महिलांना ही नरकयातना सहन करावी लागली त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना ज्या दिव्यातून जावे लागले त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. केवळ शब्दांचे खेळ करून आपले पुढारी, आपले समाजकारणी आणि आमच्यासारखे पत्रकार दुसरे काही करू शकत नाहीत. मणिपूर जळत आहे. त्या अग्नीत या महिला अग्नीचा स्पर्श न होताही जळून गेल्यागत झाल्या असतील. आणि त्याची आम्हाला जराही लाज वाटत नाही. अशा समाजाला सभ्य समाज म्हणता येईल काय?