मुंबई

एमएमआर मधील विकासाला गती देण्यासाठी एमएमआरडीएची टीम दावोसमध्ये

जागतिक स्तरावरून निधी, तंत्रज्ञान निश्चित करण्यासाठी प्रयत्न
मुंबई : प्रतिनिधी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे शिष्टमंडळ दावोस, स्वित्झर्लंड येथील जागतिक आर्थिक मंच वार्षिक परिषद २०२६ यात सहभागी झाले आहे. या शिष्टमंडळात मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) डॉ.संजय मुखर्जी, भा.प्र.से., महानगर आयुक्त, यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एमएमआरडीएची टीम देखील उपस्थित आहे.

या दौऱ्याचा मुख्य उद्देश मुंबई महानगर प्रदेशातील विकासाला गती देण्यासाठी जागतिक स्तरावरून निधी आणि तंत्रज्ञान निश्चित करणे हा असल्याचे एमएमआरडीएच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

क्रॉसरेल इंटरनॅशनलसोबत धोरणात्मक बैठक : एमएमआरडीएच्या टीमने ‘क्रॉसरेल इंटरनॅशनल’चे (यूके आधारित अग्रगण्य सल्लागार संस्था) मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल डायसन यांची भेट घेतली. या चर्चेतून मेट्रो आणि शहरी वाहतूक क्षेत्रातील सहकार्यावर पुन्हा शिक्कामोर्तब करण्यात आले असून, ज्ञान देवाणघेवाण आणि क्षमता बांधणीच्या संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बर्कले विद्यापीठासोबत संवाद: एमएमआरडीएच्या टीमने बर्कले विद्यापीठाचे प्राध्यापक ख्रिस बुश यांच्याशी संवाद साधला. या भागीदारीमुळे शैक्षणिक देवाणघेवाण, संशोधन आणि शहरी विकासातील नवनवीन प्रयोगांसाठी नवे मार्ग खुले होतील. तसेच मुंबईला भारत आणि आशियाची ‘टॅलेंट कॅपिटल’ बनवण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने ‘जागतिक आर्थिक मंच २०२६’ हे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल. याद्वारे जागतिक उद्योजक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी होणाऱ्या चर्चेतून थेट परकीय गुंतवणूक वाढवणे, औद्योगिक भागीदारीला चालना देणे, रोजगार निर्मिती आणि शाश्वत आर्थिक विकासावर भर दिला जाणार आहे असल्याचे एमएमआरडीएमार्फत स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *