प्रफुल्ल पटेल आता पवार कुटुंबाचे ‘मुखिया’ बनले आहेत का? विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल!
मुंबई प्रतिनिधी:राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्यावरून जोरदार वावटळ उठली असतानाच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत प्रफुल्ल पटेल आणि भाजपवर टीकेचे आसूड ओढले आहेत. “राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांचा होता, प्रफुल्ल पटेलांचा नाही; मग आता पटेल स्वतःला पवार कुटुंबाचे मुखिया समजायला लागले आहेत का?” असा बोचरा सवाल राऊत यांनी उपस्थित केल्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
अजित पवार यांनी आपल्या शेवटच्या क्षणांपर्यंत भाजपच्या दबावापुढे गुडघे टेकले नाहीत, असा दावा करताना राऊत म्हणाले की, अजितदादांनी एकनाथ शिंदेंसारखा आपला स्वाभिमान खुंटीला टांगून ठेवला नव्हता. प्रफुल्ल पटेल हे तर केवळ दिल्लीश्वरांचे आदेश पाळणारे भक्त आहेत, अशी तोफ डागत त्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरून पटेलांना घेरले आहे. “हिंदू संस्कृतीत निधनानंतर १३ दिवस शोक पाळला जातो, पण इथे मात्र राजकीय गिधाडे सत्तेसाठी उतावीळ झाली आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
केवळ स्थानिकच नव्हे, तर जागतिक मुद्द्यांवरही भाष्य करताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच भारताचे परराष्ट्र आणि आर्थिक धोरण ठरवत आहेत का? असा प्रश्न विचारत त्यांनी ५६ इंचाच्या छातीवरून पंतप्रधानांना लक्ष्य केले. “अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचा गळा घोटला जाणार आहे आणि मंत्री पीयूष गोयल यावर सरळ खोटे बोलत आहेत,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही पाय भाजपमध्ये असून त्यांच्या पक्षातील ‘वतनदारांनी’ मुश्रीफांसारख्या प्रवचनकारांना पुढे केले आहे, अशी टीका करताना राऊत यांनी मुश्रीफांच्या घरी पडलेल्या ईडीच्या छाप्याची आठवणही करून दिली. “जेव्हा संकट येते तेव्हा हे धिप्पड नेते कोठे लपून बसतात?” असा सवाल करत त्यांनी महायुतीमधील अस्वस्थता चव्हाट्यावर आणली आहे. आता राऊतांच्या या ‘जळजळीत’ प्रश्नांना प्रफुल्ल पटेल किंवा भाजपचे नेते काय प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
—
Deepak Kaitke





