बदलापूर, दि.५,प्रतिनिधी:बदलापूरमधील सांडपाणी आणि अनधिकृत बांधकामांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाला जाग आली.याबाबत मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ हे बदलापूर नगरपरिषदेमध्ये आले होते.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रकल्प आणि समस्या जाणून घेतल्या आहेत.
बदलापूर नगरपरिषद हद्दीतील गृह संकुलांमधून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याच्या योग्य व्यवस्थापनाचा प्रश्न सध्या गंभीर बनला असून, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. अनेक गृह संकुलांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) नसणे किंवा असलेले प्रकल्प कार्यरत नसल्यामुळे पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर गृह संकुलांचे बांधकाम झाले असले तरी सांडपाणी व्यवस्थापनाबाबत नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नाले, ओढे व मोकळ्या जागेत सोडले जात असल्यामुळे दुर्गंधी, जलप्रदूषण तसेच साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे.
या प्रकरणात नगरपरिषद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी महोदयानी बुधवारी कुळगांव बदलापूर नगरपरिषदेला भेट दिली. शहरातील सांडपाणी व्यवस्थापन केंद्राची पाहाणी केली आहे. तसेच अतिक्रमण कारवाईचा आढावा घेतला असून पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी नगरपरिषद अधिकाऱ्यांना केले आहे.
“मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बदलापूर शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली आहे.हे सांडपाणी कुठे जाते? प्रकल्पाची क्षमता काय ? हे जाणून घेऊन त्यासाठी उपायोजना करण्याच्या सूचना केल्या.लवकरच १२ एमएलडी क्षमतेचा एसटीपी प्रकल्प सुरू होत आहे.सांडपाणी नाल्यामध्ये येते ते एसटीपी प्लांट पर्यंत जात आहे का? याची तपासणी सुरू आहे.” डॉ.श्रीकृष्ण पांचाळ – जिल्हाधिकारी ठाणे




