एसटीच्या तिजोरीत भर पाडण्यासाठी आता गाड्यांच्या ‘वक्तशीरपणा’चा मंत्र कामी येणार का?
मुंबई (विशेष प्रतिनिधी):एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी केवळ प्रवासी संख्या वाढवणे पुरेसे नसून, बसेसचा ‘वक्तशीरपणा’ (Punctuality) सुधारणे हाच कळीचा मुद्दा ठरणार असल्याने आता लाल परी खरंच वेळेवर धावणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात आयोजित केलेल्या उत्पन्नवाढ आढावा बैठकीत प्रशासनाला याबाबत कडक शब्दात समज दिली आहे. “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील,” असा ठाम संदेश देत त्यांनी एसटीच्या सेवेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एसटी ही जरी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असली आणि सुरक्षित प्रवास तसेच सवलतींमुळे प्रवाशांचा ओघ वाढत असला, तरी नियोजित वेळेत गाड्या न सुटल्यास हा प्रवासी वर्ग टिकवणे कठीण जाईल, अशी भीती सरनाईक यांनी व्यक्त केली. प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना अप्रत्यक्षपणे खासगी वाहतुकीकडे वळण्यास भाग पाडणे होय. सध्या अनेक आगारांमध्ये गाड्या उशिरा सुटणे, प्रवासात त्या नादुरुस्त होऊन बंद पडणे किंवा ऐनवेळी फेऱ्या रद्द होणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यावर मंत्री सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आगार प्रमुखांनी अधिक जबाबदारीने वागण्याचे आणि प्रत्येक फेरी वेळेतच सुटेल याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
एकीकडे इंधन आणि देखभालीचा खर्च वाढत असताना दुसरीकडे उत्पन्न वाढीसाठी वक्तशीरपणा हाच प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. वारंवार होणाऱ्या विलंबामुळे हक्काचा प्रवासी एसटीपासून दुरावतो, हे परवडणारे नाही. त्यामुळे उत्पन्न वाढवण्यासोबतच खर्चात कपात करणे आणि स्थानिक पातळीवर गाड्यांची योग्य देखभाल करणे यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “वक्तशीरपणा हीच एसटीची नवी ओळख निर्माण झाली पाहिजे,” असे आवाहन करत त्यांनी प्रशासनाला अधिक सक्षम आणि तत्पर होण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या आदेशानंतर तरी प्रवाशांना वेळेवर बससेवा मिळणार का आणि एसटी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
—
Deepak Kaitke




