सांगलीच्या ग्रामीण सत्तेची चावी कुणाकडे? पाहा, कुणी राखला बालेकिल्ला आणि कुठे झाले सत्तांतर!
विशेष प्रतिनिधी:सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून जिल्ह्याच्या ‘मिनी मंत्रालयाचे’ राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत काही तालुक्यांत सत्ताधारी महायुतीने आपले वर्चस्व राखले आहे, तर काही ठिकाणी महाविकास आघाडीने मुसंडी मारत प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला आहे. जिल्ह्यातील एकूण ९२ गणांपैकी २९ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी इतर तालुक्यांमध्ये प्रादेशिक नेत्यांचा करिष्मा पाहायला मिळाला.
मिरज आणि जत या मोठ्या तालुक्यांमध्ये भाजपने आपले कमळ फुलवत पकड मजबूत केली आहे. जतमध्ये १८ पैकी १२ जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता मिळवली, तर मिरजमध्ये २२ पैकी १० जागांवर विजय मिळवून मोठे यश संपादन केले. मात्र, वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने २२ पैकी १४ जागा जिंकत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. येथे सत्तेचा रिमोट पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्याकडेच राहिल्याचे स्पष्ट झाले.
खानापूर तालुक्यात आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट) पक्षाने ८ पैकी ८ जागा जिंकून ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’ दिला आहे. कडेगावमध्ये काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करत ८ पैकी ७ जागा खिशात घातल्या, तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तासगाव आणि शिराळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने चुरशीच्या लढतीत वर्चस्व राखले असून तासगावमध्ये त्यांनी ६ पैकी ४ जागा जिंकल्या आहेत. शिराळ्यात चुरशीच्या लढतीत अजित पवार गटाला ३, भाजपला २ आणि शरद पवार गटाला २ जागा मिळाल्या असून एक जागा अपक्षाच्या पदरात पडली आहे. या संमिश्र निकालांमुळे सांगलीच्या ग्रामीण राजकारणात आता नवीन समीकरणे पाहायला मिळणार आहेत.
—
Deepak Kaitke




