उल्हासनगर , दि . ९ प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॅम्प चार व पाच मध्ये कमकुवत नेतृत्व आणि नियोजना च्या अभावा मुळे शिवसेनेला मोठा फटका बसला असून याचा परिणाम आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पडणार असल्याची चिंता शिवसेनेला भेडसावत आहे .
२०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील कॅम्प ५ विभागातील प्रभाग क्रमांक १९ आणि २० मध्ये शिवसेनेचे सात नगरसेवक निवडून आले होते. तथापि, २०२६ च्या निवडणुकीत शिवसेनेला सातपैकी फक्त एक जागा मिळाली,यात ही मीना सोंडे यांचा निसटता विजय झाला हा शिवसेने साठी मोठा धक्का मानला जात आहे.खासकरून आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या साठी धोक्याची घंटा समजली जात आहे.
प्रत्यक्षात कॅम्प ५ मधील सिंधी भागात शिवसेनेच्या उमेदवारांकडे कोणीही लक्ष दिले नाही. ज्याप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमर लुंड आणि शंकर लुंड या दोन भावांना कॅम्प चार आणि पाच ची जबाबदारी सोपवली होती, त्याचप्रमाणे शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला ती जबाबदारी देण्यात आली नाही. खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांचा पप्पू कलानी वर पूर्ण भरोसा होता की सिंधी मतदार शिवसेना कडे वळवण्यात कलानी पिता पुत्र सक्षम आहेत. परंतू या भागात पप्पू कलानी ओमी कलानी यांचा करिष्मा अजिबात चालला नाही. विशेष म्हणजे आता जे उमेदवार भाजपा च्या तिकिटावर निवडून आले आहेत त्यांना निवडणुकी पूर्वी त्यांच्या भागात विकासाचे काम करण्या साठी आमदार किणीकर यांनी भरपूर निधी दिला होता. हा निधी शिवसेने च्या लोकांना दिला असता तर कमीत कमी शिवसेनेला त्याचा लाभ नक्कीच झाला असता अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
भाजपने येथे १४ जागा जिंकून शिवसेनेला मोठा धक्का दिला. सहा जागांच्या पराभवाचा सर्वात वाईट परिणाम आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या विधानसभा मतदारसंघावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही..या विजयामुळे भाजपचे मनोबल कमाली चे उंचावले आहे. आगामी अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत भाजपचा दावा अधिक मजबूत होताना दिसत आहे. जर शिवसेनेला भविष्यात विधानसभा मतदारसंघ मजबूत करायचा असेल तर त्यांना सक्षम, अनुभवी लोकांना पक्षाची जबाबदारी द्यावी लागेल,सिंधी समाजातील मतदार शिवसेने कडे वळवण्या साठी सिंधी नेतृत्व ला उभारी द्यावी लागेल अन्यथा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मोठा पराभव सहन करावा लागू शकतो अशी भावना येथील शिवसैनिक व्यक्त करित आहेत.




