टॉप स्टोरी महाराष्ट्र

मंत्रालयात खळबळ: मंत्री नरहरी झिरवळ यांचा कारकून लाच घेताना रंगेहाथ पकडला, थेट पीएसचे नाव आल्याने मंत्र्यांची खुर्ची धोक्यात?

विशेष प्रतिनिधी,मुंबई: राज्याच्या मंत्रालयातील भ्रष्टाचाराचे जाळे आता थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचे निकटवर्तीय कारकून राजेंद्र ढेरंगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी सायंकाळी मंत्रालयातच रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे, या लाचखोरीचे धागेदोरे मंत्र्यांच्या खासगी सचिवालयापर्यंत जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागात वैद्यकीय परवाना देण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपये ठरले. तक्रारदाराच्या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सापळा रचला आणि सायंकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी राजेंद्र ढेरंगे याला पैसे स्वीकारताना ताब्यात घेतले. अटकेनंतर ढेरंगे याने दिलेल्या जबानीत धक्कादायक खुलासा केला असून, मंत्र्यांचे खासगी सचिव (PS) रामदास गाडे यांच्या सांगण्यावरूनच आपण ही रक्कम स्वीकारत होतो, असा दावा त्याने केल्याचे समजते.
या कारवाईवेळी रामदास गाडे हे मंत्री झिरवळ यांच्यासोबत दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केला असला, तरी मंत्रालयातील भ्रष्टाचार उघड झाल्याने सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे. दरम्यान, ‘महाभ्रष्ट’ महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात खुलेआम कमिशनखोरी सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जनतेची कामे पैशांशिवाय होत नाहीत, ही गंभीर बाब असून मुख्यमंत्र्यांनी यावर तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *