मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळालेच नाही, त्यामुळे ‘ओरिजिनल’ म्हणवणाऱ्या शिवसेनेची साथ घेणे भारतीय जनता पक्षाला भाग पडले. शिंदे साहेबांना हे ठाऊकच होते कारण तेही पन्नास वर्षांच्या गुरुचे चेले आहेत, मग त्यांनीही आपला हिस्सा बरोबर वसूल केला.
तिकडे २५ वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या एकसंघ शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे त्यांना सत्ता गमवावी लागली. ती शिवसेना आणि ही शिवसेना सोबत राजसेना, यांच्यासह काँग्रेस असती तर एकूण बेरजेवरून मुंबईवर सेनेचे अधिपत्य दिसले असते. आता खऱ्या म्हणवणाऱ्या शिवसेनेबरोबर ओरिजिनल शिवसेना स्थापन करणाऱ्या बाळासाहेबांच्या पुत्राला म्हणजेच ठाकरे परिवाराला वेगळेच जाणवले असेल. थोडक्यात ‘असून खास मालक घराचा राहतो उपाशी’ यामध्ये दोष कुणाचा आहे हे शोधणे आमचे काम नाही आणि तसेही आम्ही तरी नसत्या उचापती का कराव्यात.
त्यापेक्षा उबाठा सेना आणि मनसे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आलेले आहे. भविष्यवेत्त्यांवर अतिविश्वास टाकून हात पोळलेल्या उद्धवरावांनी यावेळेस माजी महापौर आणि संकट काळातही एकनिष्ठ राहिलेल्या किशोरीताई पेडणेकर यांच्याकडे विरोधी पक्षाच्या दालनाची खुर्ची आणि किल्ली दिलेली आहे. महानगरपालिकेच्या राजकारणाचे सर्व छक्के-पंजे यांच्यासह सत्ता आणि सत्तेच्या वाटणीसह त्यांची वळणे किशोरीताईंना पूर्णपणे माहीत आहेत. त्या ‘फायरब्रँड’ नेत्या आहेत, बोलण्यात पटाईत आहेत. नेमक्या खाचा आणि खळगे शोधून मुंबईला सुंदर बनवण्यासाठी तसेच मुंबईचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा फायदाच होऊ शकतो.
आत्ताच्या राजकारणात विरोधी पक्ष म्हणजे आपला वैरी आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याचे दिवस आलेले आहेत. विद्यमान महापौर रितू तावडे मूळच्या काँग्रेसच्या आहेत. म्हणजे त्याही समन्वयवादी असाव्यात असा आमचा कयास आहे. सद्यस्थितीत मुंबईच्या समस्या घनघोर आहेत, कारण एकेकाळी मुंबईचे रस्ते पहाटे पाण्याने धुतले जात असत हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. तेव्हाच्या पाण्याचा निचरा सूर्यकिरणे पडण्याबरोबर होत असे, आता तर त्यावरही पाणी पडलेले आहे. स्वच्छतेसाठी पाणी टाकले तर मुंबईतील अनेक भागात पाण्याचे गटार होतील. ज्या मुंबईला आंतरराष्ट्रीय महानगर म्हटले जाते, अशा खड्डेमय मुंबईची ‘तुंबई’ होऊ नये यासाठी सरकारनेही मदत करणे गरजेचे आहे.
आता तर ट्रिपल म्हणजेच तीन इंजिनचे सरकार असल्यामुळे या तिन्ही इंजिनांनी एका दिशेने धावणे गरजेचे आहे. ही तिन्ही इंजिने एका दिशेने धावली पाहिजेत, तरच या मुंबईला आणि मुंबईच्या जनतेला सुखदायी ठरतील असे परिणाम दिसणार आहेत. ही तिन्ही इंजिने एकत्र धावली तर गार्ड म्हणून उभ्या असलेल्या किशोरीताई पेडणेकर यांनीही या तीन इंजिनच्या मोटरमनला हिरवी झंडी दाखवली पाहिजे.
आता मुंबईत संपूर्णपणे महिला राज आलेले आहे. महापौर महिला आणि विरोधी पक्षनेत्याही महिला आहेत. प्रत्येक घराचे घरपण हे त्या घरातील स्त्रीवर म्हणजेच महिलेवर अवलंबून असते, कारण स्त्रियाच घराला घरपण देतात असे आम्ही मानतो. त्यामुळेच अनुभवी असलेल्या किशोरीताईंनी विकासाच्या मार्गावर जाण्यासाठी सहकार्य करावे. ज्यामुळे केवळ पालिकेलाच नाही, तर मुंबईला सुद्धा एक वेगळे ‘घरपण’ मिळेल. या निमित्ताने एक अजब योगायोग जुळून आलेला आहे. यापूर्वी किशोरीताई पेडणेकर महापौर होत्या, आता भारतीय जनता पक्षाच्या रितूताई तावडे महापौर आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेत पहिल्या महिला विरोधी पक्षनेते पदाची माळ किशोरीताई यांच्या गळ्यात पडलेली आहे.
मुंबई सांभाळण्याची जबाबदारी यापुढे स्त्री शक्तीकडे आहे. एकमेकींना सहकार्य करून श्रीमंत आणि सुप्रसिद्ध असलेल्या मुंबई पालिकेला घरपण मिळेल असे कार्य त्यांच्याकडून घडो. या कार्यात मुंबईची मुंबादेवी त्यांना सुयश देवो, इतकीच प्रार्थना आहे!




