नवी मुंबई

माझी वसुंधरा अभियान 5.0’ नवी मुंबई महानगरपालिका राज्यात व्दितीय

नवी मुंबई:महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अमृत शहरांच्या गटात ‘राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे मानांकन’ प्राप्त झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सातत्यपूर्ण यशस्वी वाटचालीत हा आणखी एक बहुमान लाभल्याबद्दल नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आनंद व्यक्त करीत सर्व नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ हे दि. १ जून २०२४ ते दिनांक ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील ४२२ नागरी स्थानिक संस्था व २७,८९५ ग्रामपंचायती अशा एकूण २८,३१७ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. यात नवी मुंबई महानगरपालिकेने पंचतत्वांपैकी प्रत्येक तत्वाशी निगडीत थिमॅटिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये व्दितीय क्रमांकाचा बहुमान प्राप्त केलेला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मूल्यमापन व फिल्ड मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोन्ही मूल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान ५.० मधील राज्यातील सर्वोत्तम स्थानिक स्वराज्य संस्थांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने द्वितीय क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे.

माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने भूमी थिमॅटिक क्षेत्रांतर्गत भूमी संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत शहरी विकासाच्या दिशेने सातत्याने प्रभावी पावले उचलेली आहेत. यादृष्टीने मोठया प्रमाणात वृक्षलागवड केली व त्यामध्ये विशेषत्वाने जैवविविधतेला प्राधान्य मिळेल अशा देशी वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली. या वृक्षांची जिओ टॅगिंगसह वृक्ष गणना करण्यात आली आहे. या सोबतच रोप वाटिकांची निर्मिती आणि त्यामध्ये स्थानिक वृक्ष प्रजातीचे संवर्धन करण्यावर भर देण्यात आला असून नवीन हरित क्षेत्रांचा विकास करुन शहरात किमान 33 टक्के हरित आच्छादन करण्यासाठी नियोजन बध्द कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. वृक्ष लागवडीत प्राधान्याने बांबू, खस/वेटिव्हर, शेवगा यांसारख्या मृदा संवर्धन करणाऱ्या वनस्पतींची लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे बीज संकलन केंद्राची स्थापना करुन स्थानिक बीज संवर्धन उपक्रम मोठया प्रमाणावर राबविण्यात आले. यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करुन त्यांच्यावर पर्यावरण संवर्धनाचे संस्कार करण्यात आले.

त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या सुपर स्वच्छ लीग या विशेष कॅटेगरीमध्ये समाविष्ट देशातील 4 व राज्यातील एकमेव शहर असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेने कच-याचे निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरण व नियोजनबध्द संकलन व्यवस्थेवर भर दिला आहे. ओल्या कच-यापासून खत निर्मिती, सुक्या कच-याचे वर्गीकरण व पूनर्वापर, प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाची काटेकोर अंमलबजावणी व सिंगल यूज प्लास्टिकला प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला जात आहे. त्यासोबतच बायोमेडिकल कच-याचे आणि ई कच-याचे सुयोग्य संकलन व शास्त्रोक्त विल्हेवाट अशा सर्वच बाबींकडे काळजीपूर्वीक लक्ष दिले जात आहे.

वायू थिमॅटिक क्षेत्रांतर्गत नवी मुंबईतील हवा गुणवत्ता चांगली रहावी या करिता विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असून बांधकाम साईट्ससाठी मानक कार्यप्रणाली (SOP) निश्चित करण्यात आली आहे व त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी नियमित तपासणी केली जात आहे. शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत व नियंत्रणात्मक कार्यवाही केली जात आहे. प्रयोगशाळांमार्फत नियमित वायू गुणवत्ता परीक्षण तसेच बांधकाम व पाडकाम कच-याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सवयींना प्रोत्साहन सायकलिंग ट्रॅकची निर्मिती व पादचारी मार्गांचा विकासकेला जात आहे तसेच इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच ई – वाहन चार्जिंग स्टेशनची उभारणी केली जात आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठीही नियमित तपासणी व कडक अंमलबजावणी केली जात आहे. अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ, प्रदूषणमुक्त व शाश्वत शहरी पर्यावरणासाठी आणि वायू गुणवत्तेच्या संतुलनासाठी प्रभावी पावले उचललेली आहेत.

जल थिमेटिक क्षेत्रांतर्गत जल संसाधनांचे संवर्धन व पुनरुज्जीवन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून सार्वजनिक इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीच्या अंमलबजावणीवर भर देण्यात येत आहे. यासोबतच भूजल पुनर्भरणासाठी विहिरींचा उपयोग, पाण्याचे नुकसान (Non-Revenue Water) मोजणी व गळती नियंत्रणासाठी उपाययोजना करणे,सार्वजनिक इमारतींचे व पाणीपुरवठा यंत्रणेचे जल लेखापरीक्षण (Water Audit) करणे, पाणी पुरवठा यंत्रणेचे जल लेखापरीक्षण व कार्यक्षमता वृद्धी, नियमित जल गुणवत्ता निरीक्षण व तपासणी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी व प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरअशा विविध बाबींकडे लक्ष देत अभियानांतर्गत जलसंपत्तीचे संरक्षण, पुनर्भरण व शाश्वत वापर यासाठी वैज्ञानिक, नियोजनबद्ध व दीर्घकालीन दृष्टीकोनातून कामे करण्यात येत आहेत.

अग्नी थिमॅटिक क्षेत्रांतर्गत नूतनीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर करणे व “निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन” (Net Zero) संकल्पनेबाबत व्यापक जनजागृती व प्रसार केला जात आहे. कार्बन उत्सर्जन कमी असलेल्या ऊर्जा स्रोतांचा अवलंब व ऊर्जा कार्यक्षम अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. हरित पथदिव्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि अक्षय ऊर्जा प्रकल्पांची उभारणी (सौर ऊर्जा प्रकल्प इ.) यावर भर दिला जात आहे. हरित इमारती संकल्पनेनुसार इमारतींची उभारणी करण्यास विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. सार्वजनिक इमारतींचे ऊर्जा लेखापरीक्षण (Energy Audit) व ऊर्जा बचत उपाययोजना राबविण्यासोबतच कुल रूफिंग (Cool Roofing) संकल्पनेची अंमलबजावणी करून उष्णता कमी करण्यावर भर दिला जात आहे.या अभियानांतर्गत ऊर्जा बचत, कार्बन उत्सर्जन कमी करणे व अक्षय ऊर्जेचा प्रसार यासाठी ठोस आणि दीर्घकालीन धोरणात्मक पावले उचलली जात आहेत.

आकाश थिमॅटिक क्षेत्रांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने विविध प्रचार व प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर केला असून ई-प्लेज (#Epledge) नोंदणी व उद्दिष्टपूर्तीची सक्रिय अंमलबजावणी केली आहे. अभियानाची व्यापक जनजागृती करण्यासोबतच विविध स्पर्धा, मोहिमा व जनजागृती उपक्रमांद्वारे नागरिकांच्या सहभागावर भर देण्यात आला आहे. यामध्ये विशेषत्वाने शहराचे भविष्य असणा-या विद्यार्थ्यांच्या सहभागावर भर देण्यात आला असून त्यासोबतच तरुणांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करून पर्यावरण दूतांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र यूथ फॉर क्लायमेट अॅक्शन (MYCA) उपक्रमांतर्गत हवामान बदलाविषयी तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने पर्यावरण सेवा योजनेंतर्गत शाळा व महाविद्यालयांच्या सक्रिय सहभागाकडे विशेष लक्ष देण्यात आले. तसेच सार्वजनिक ठिकाणी दृश्यरूपात प्रसिद्धी माहिती फलक, भित्तीचित्रे व डिजिटल माध्यमांव्दारे जनजागृतीवर भर दिला आहे. बचत गटांच्या (SHGs) सहभागाकडे लक्ष देतांनाच सीएसआर, सामुदायिक सहभाग व इतर माध्यमांतून पर्यावरण विषयक कामांसाठी निधी उभारणीवरही भर देण्यात आला आहे.

‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ अंतर्गत निर्सगाच्या पंचतत्वांना अनुरुप विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भर देण्यात आला असून त्यामध्ये व्यापक स्वरुपात लोकसहभाग राहील व या माध्यमातून पर्यावरण चळवळ उभी रहावी अशी भूमिका जपल्यामुळेच हा गौरव महानगरपालिकेस प्राप्त झाला असल्याचे सांगत महापौर सुजाता पाटील यांनी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

अभियानाच्या सर्व पाचही थिमॅटिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्यामुळे राज्यात मोठया शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई महानगरपालिकेला व्दितीय मानांकनाचा बहुमान प्राप्त झालेला असून हा सर्व लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी, कर्मचारी व पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्या एकत्रित कार्याचा गौरव आहे असे मत व्यक्त करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यापुढील काळात शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल प्रतिबंध या दिशेने नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने पुढाकार घेत राहील असा विश्वास व्यक्त केला आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *