नवी मुंबई

शिक्षांगणचा तिसरा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

नवी मुंबई:श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट संचालित गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणाऱ्या शिक्षांगणाचा तिसरा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नेरुळ येथील आगरी कोळी भवन सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ट्रस्टचे अध्यक्षचे अध्यक्ष राधाकृष्णन यांनी सांगितले कि, या ट्रस्टच्या वतीने १२ शिक्षांगण वर्ग चालवण्यात येतात. शिक्षांगण ही वंचित व गरजू विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणारी मोफत अभ्यासवर्ग केंद्रे आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही कार्यरत आहेत. नवीन पनवेल, खांदेश्वर, खांदा कॉलनी, बेलापूर गाव, सीबीडी बेलापूर, बोन्सारी, पावणे, रबाळे, दिघा, कळवा आणि ठाणे या भागांमध्ये ही केंद्रे कार्यरत आहेत.
या वार्षिक कार्यक्रमात ठाणे ते पनवेल परिसरातील सर्व शिक्षांगणांतील विद्यार्थी एकत्र आले होते. विद्यार्थ्यांनी प्रार्थनागीते, नृत्य आणि लघुनाटिकांद्वारे पर्यावरण संरक्षण, महिलांची सुरक्षा व सशक्तीकरण, प्लास्टिकमुक्ती, अन्न व भूकमारी या सामाजिक विषयांवर प्रभावी संदेश दिला. महाशिवरात्रीच्या औचित्याने सादर करण्यात आलेल्या शिवतांडव नृत्याने कार्यक्रमात आध्यात्मिक रंग भरला. या विद्यार्थ्यांपैकी अनेक मुले झोपडपट्टी किंवा लहान चाळींमध्ये राहतात. सरावासाठी पुरेशी जागा नसतानाही काही ठिकाणी रस्त्यावर व मोकळ्या जागेत सराव करून त्यांनी सादर केलेली उत्कृष्ट कामगिरी उपस्थितांना भावली. योग्य संधी व मार्गदर्शन मिळाल्यास ही मुले कोणत्याही स्तरावर यश मिळवू शकतात, याची जाणीव या कार्यक्रमातून प्रकर्षाने झाली, असे राधाकृष्णन यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टचे व्यवस्थापक अजित खताळ व खांदेश्वर शिक्षांगणाच्या शिक्षिका जयश्री वरपे यांनी केले. सुमारे ५५० विद्यार्थी, पालक, देणगीदार, स्वयंसेवक व हितचिंतक या कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *