टॉप स्टोरी राजकारण

राष्ट्रवादीच्या ‘मॅजिक फिगर’मध्ये ६ आमदारांची घट? सुनेत्रा पवारांच्या निवडीपूर्वीच ‘लेटर वॉर’ने उडवली झोप!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गादीवर कोण बसणार, याचा पेच सुटल्याचे वाटत असतानाच एका नवीन गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. येत्या २६ फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होणार असल्याचे निश्चित मानले जात असले, तरी पक्षातील सर्वच्या सर्व ४१ आमदारांनी त्यांच्या नावाला लेखी संमती दिलेली नाही, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सुनेत्रा वहिनींच्या नावाच्या प्रस्तावावर केवळ ३५ आमदारांनीच सह्या केल्या असून, उरलेल्या ‘त्या’ आमदारांच्या मौनाचे गुपित काय, या प्रश्नाने प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या गटाची डोकेदुखी वाढवली आहे.
रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींचे वाभाडे काढले. “सुनेत्रा काकींच्या नावावर ३५ आमदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, मात्र ज्यांनी सह्या केलेल्या नाहीत ते आमदार आणि पदाधिकारी कोण आहेत, हा खऱ्या अर्थाने संशोधनाचा विषय आहे,” असे म्हणत रोहित पवारांनी पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत दिले आहेत. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चांना या दाव्यामुळे नवे बळ मिळाले असून, सह्या न करणारे आमदार नेमके कोणाच्या संपर्कात आहेत, यावरून आता तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
याशिवाय, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बोलताना रोहित पवारांनी एक भावनिक खुलासा केला. अजितदादांना पक्ष आणि कुटुंब एकत्र यावे अशी मनापासून इच्छा होती आणि त्यासाठी ते पक्षात मोठे फेरबदल करण्यासही तयार होते, असा दावा त्यांनी केला. प्रदेशाध्यक्षपदी डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारखा तरुण आणि आक्रमक चेहरा असावा, असे दादांचे व्हिजन होते आणि म्हणूनच कोल्हे अनेक बैठकांमध्ये सक्रिय होते, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, आता दादांच्या पश्चात ३५ आमदारांचे पाठबळ असलेल्या सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंध राहणार की सह्या न करणाऱ्या आमदारांमुळे पुन्हा एखादा राजकीय भूकंप होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *