राजकारण

शिवाजी पार्कवर काका-पुतण्यांचे मनोमिलन की राजकीय ‘सस्पेन्स’? राज्यसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरेंचा मित्रपक्षांना ‘पॉवरफुल’ इशारा!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ही काका-पुतण्याची जोडी गुरुवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या सुशोभीकरण सोहळ्यात एकाच मंचावर दिसली आणि राजकीय चर्चांना उधाण आले. विशेष म्हणजे, अवघ्या २४ तासांपूर्वीच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘नंदनवन’ निवासस्थानी जाऊन अर्धा तास गुप्त भेट घेतली होती. या भेटीने सत्तेच्या समीकरणांची चर्चा सुरू असतानाच, गुरुवारी काका-पुतण्यांनी एकत्र येऊन सुशोभीकरणाचा नारळ वाढवल्याने सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र, या भेटीबाबत विचारलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी केवळ सूचक मौन पाळत एकही शब्द बोलण्याचे टाळले.

मैदानाच्या सुशोभीकरणाचा सोहळा पार पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी थेट आगामी राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची झोप उडवली आहे. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागेवर “रोटेशन” नुसार शिवसेनेचाच नैसर्गिक दावा असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. सध्या या जागेसाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच, आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचा दावा ठोकल्याने आघाडीत आता जागावाटपावरून ‘कलगीतुरा’ रंगण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता त्यांचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो, पण तो उमेदवार शिवसेनेचाच असावा असा पवित्रा आदित्य ठाकरेंनी घेतल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे.

या सर्व घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनीही आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही कोणाची हेरगिरी करत नाही, पण ज्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेशी आणि विचारांशी बेईमानी केली, त्या प्रवृत्तीविरोधात आमचा लढा कायम राहील,” अशा शब्दांत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे आणि शिंदे यांच्या भेटीबद्दल राज ठाकरेंनाच विचारणे योग्य ठरेल, असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. एका बाजूला शिवाजी पार्कवरील हे कौटुंबिक दर्शन आणि दुसरीकडे राज्यसभेच्या जागेवरून सुरू झालेली ही ‘पॉवर गेम’ आगामी काळात राज्याच्या राजकारणात कोणते मोठे वळण घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *