स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ‘महाराष्ट्र राज्य एम्प्लॉइज जनरल युनियन’ सज्ज
उल्हासनगर , दि . २० प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य एम्प्लॉइज जनरल युनियन’ या नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चरणसिंह टाक, उपाध्यक्ष विनोद केणे आणि सचिव नीलम कदम यांनी अधिकृतपणे या संघटनेच्या स्थापनेची माहिती दिली.
राज्यभरातील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सध्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांचे तातडीने निराकरण करणे आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे, हे संघटनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे अध्यक्ष चरणसिंह टाक यांनी स्पष्ट केले आहे .
संघटनेचे उपाध्यक्ष विनोद केणे यांनी यावेळी आक्रमक भूमिका मांडत सांगितले की, “संपूर्ण महाराष्ट्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या न्याय् हक्कासाठी ही संघटना सदैव तत्पर राहील. कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासोबतच, त्यांना कामाच्या ठिकाणी सन्मान आणि त्यांचे कल्याण साधणे हेच माझे मुख्य ध्येय आहे.”
संघटनेचा विस्तार करण्यासाठी आणि तळागाळातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लवकरच सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि विशेषतः उल्हासनगर महानगरपालिकेत युनिट स्थापन करण्यात येणार आहेत. याठिकाणी सक्षम पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी यंत्रणा उभारली जाईल, असेही केणे यांनी नमूद केले.



