राजकारण

आठवलेंचा ‘मास्टरस्ट्रोक’! मुंबईतील ‘रिपब्लिकन’ फळी एका दमात भुईसपाट; ५ एप्रिलपर्यंत नव्या दमाची फौज उतरवणार

मुंबई | विशेष प्रतिनिधी:आगामी काळातील राजकीय समीकरणे आणि पक्षसंघटनेतील मरगळ झटकण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत मोठी राजकीय शस्त्रक्रिया केली आहे. पक्षाला नवी उभारी देण्यासाठी आठवलेंनी मुंबईतील सर्व तालुका आणि वॉर्ड कमिट्या तातडीने बरखास्त करण्याचे धाडसी आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे मुंबईतील जुन्या पदाधिकाऱ्यांचे अधिकार संपुष्टात आले असून, आता निवडणुकांच्या माध्यमातून नवीन तरुण रक्ताला संधी दिली जाणार आहे.
आझाद मैदानातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी या खळबळजनक निर्णयाची घोषणा केली. केवळ आदेशावर नियुक्त्या न करता, यावेळी लोकशाही पद्धतीने निवडणुका घेऊनच अध्यक्ष निवडले जातील, असा पवित्रा आठवलेंनी घेतला आहे. या प्रक्रियेसाठी २५ फेब्रुवारीपासून मुंबईभर जोरदार सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार असून, ५ एप्रिल २०२६ पर्यंत नवीन वॉर्ड आणि तालुका कार्यकारिणीची निवड पूर्ण करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
पक्षात नवतरुणांना मोठ्या प्रमाणावर सामावून घेणे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देणे, हा या बरखास्तीमागचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेत जे कार्यकर्ते सक्रिय सदस्य म्हणून नोंदणी करतील, त्यांनाच निवडणूक प्रक्रियेत मतदानाचा किंवा उमेदवारीचा अधिकार असेल. या पत्रकार परिषदेला अविनाश महातेकर, गौतम सोनवणे, बाळासाहेब गरुड आणि विवेक पवार यांसारखे पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. आता आठवलेंच्या या ‘क्लीन स्वीप’मुळे मुंबईतील रिपब्लिकन पक्षाचा चेहरामोहरा किती बदलतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *