माणूसपणाची पाऊलवाट

कर्तृत्वाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या दीपाली घाडगे : महिला सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय

महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात आज स्त्रीशक्तीचा जागर पाहायला मिळत आहे आणि या जागराचे नेतृत्व करणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वांमध्ये दीपाली घाडगे हे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. ‘चूल आणि मूल’ या पारंपरिक चौकटीला छेद देऊन महिलांनी उद्योजकतेची कास धरावी, या ध्येयवेड्या विचाराने प्रेरित होऊन दीपाली यांनी ‘दीपज्योती फाउंडेशन’च्या माध्यमातून एक फार मोठे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे चक्र सुरू केले आहे. सातारा जिल्ह्यातील वाई सारख्या एका छोट्याशा गावातून आपल्या कामाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दीपाली घाडगे यांनी आज २५ हजारांहून अधिक महिलांना आपल्या संपर्कात आणून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे.

उच्चशिक्षित असूनही केवळ स्वतःच्या करिअरचा विचार न करता, “मी भारतीय आहे आणि समाजाप्रती काहीतरी देणे लागते,” या उदात्त भावनेतून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. शासकीय खादी ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ३५ टक्के सबसिडीयुक्त कर्जाचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत कसा पोहोचवता येईल, यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. केवळ कर्ज मिळवून देणे इतपतच त्यांचे काम मर्यादित नाही, तर त्या महिलांना प्रत्यक्ष उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे तांत्रिक प्रशिक्षण आणि मानसिक पाठबळ देण्याचे कामही त्या तितक्याच ताकदीने करत आहेत.

आज राज्यभरात ६०० पेक्षा अधिक बचत गटांना त्यांनी एका सूत्रात गुंफले असून, टेलरिंग किंवा अगरबत्ती बनवण्यासारख्या पारंपरिक कामांच्या पलीकडे जाऊन आधुनिक काळाला अनुरूप असे नवनवीन उद्योग महिलांनी करावेत, यासाठी त्या आग्रही असतात. यामध्ये प्रामुख्याने डेअरी प्रॉडक्ट्स (दूध प्रक्रिया उद्योग), मसाला उद्योग, पेपर बॅग आणि पर्यावरणपूरक प्लेट्स निर्मिती, औषधी वनस्पतींची प्रक्रिया, मिलेट्स (भरड धान्य) पासून बनवलेले पौष्टिक खाद्यपदार्थ, तसेच हस्तकला आणि फॅशन डिझाइनिंग अशा विविध क्षेत्रांतील सूक्ष्म उद्योगांचा समावेश आहे. आपल्या या ध्येयवेड्या प्रवासाविषयी दीपाली घाडगे अत्यंत आत्मविश्वासपूर्ण प्रतिक्रिया देताना म्हणतात की, “आजच्या काळात महिलांना केवळ आर्थिक मदतीची नाही, तर योग्य दिशा आणि प्रशिक्षणाची गरज आहे.

शासनाकडून अनेक योजना आहेत, पण त्या योजनांचा लाभ घेताना कोणत्या महिलेमध्ये कोणता व्यवसाय करण्याची क्षमता आहे, हे ओळखणे महत्त्वाचे असते. मी जेव्हा गावोगावी फिरते, तेव्हा मला अनेक गरजू पण कष्टाळू हात दिसतात. त्यांना फक्त तंत्रज्ञानाची आणि संधीची जोड द्यायची असते. माझे स्वप्न आहे की प्रत्येक स्त्री ही केवळ गृहिणी न राहता एक उद्योजक आणि प्रशिक्षक म्हणून समाजात वावरली पाहिजे. बँकांनी जर पुढे येऊन या बचत गटांना सढळ हस्ते मदत केली आणि समुपदेशनावर भर दिला, तर महिला स्वावलंबनाचा हा प्रवास अधिक गतीने पूर्ण होईल. दीपज्योती फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अशा महिलांची मोठी फळी निर्माण करत आहोत, ज्या भविष्यात दुसऱ्यांना रोजगार देतील.”

दीपाली यांच्या या कामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी त्यांचे पती तुषार घाडगे हे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. तुषार घाडगे यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून दीपाली यांचे कार्य राज्यातील दुर्गम भागातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपल्या पत्नीच्या या कार्याबद्दल अभिमान व्यक्त करताना तुषार घाडगे म्हणतात की, “दीपालीची जिद्द आणि महिलांना संघटित करण्याची तिची हातोटी खरोखरच कौतुकास्पद आहे. वाईपासून सुरू झालेला हा प्रवास आज पुण्यातील धनकवडी येथील मुख्य कार्यालयामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला आहे, याचे मुख्य कारण म्हणजे तिने जपलेली पारदर्शकता आणि तळमळ. आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांना ई-मार्केटिंग, डिजिटल साक्षरता आणि ऑनलाइन ब्रँडिंग चे धडे देत आहोत, जेणेकरून त्यांनी तयार केलेला माल जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकेल.

दीपालीने केवळ स्वतःला सिद्ध केले नाही, तर हजारो घरांमध्ये समृद्धी आणली आहे, हे पाहून एक पती म्हणून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो.” आज दीपाली घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिला स्वतः प्रशिक्षक म्हणून तयार झाल्या असून, त्या इतर महिलांना उद्योगाचे धडे देत आहेत. बँकांचे समुपदेशन असो किंवा खादी ग्रामोद्योग विभागाच्या योजनांची अंमलबजावणी, दीपाली यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या कार्यामुळे आज राज्यभरातील सुशिक्षित युवतींसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. केवळ नोकरीच्या मागे न धावता, उद्योजक बनून समाजाला दिशा देण्याचे धाडस दीपाली घाडगे यांनी यशस्वीपणे करून दाखवले असून, भविष्यात या चळवळीतून लाखो महिला स्वावलंबी होतील, यात शंका नाही.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *