बदलापूर

बदलापूरमध्ये महिलांच्या बीजांडांची बेकायदेशीर विक्री; राज्यभरातील आयव्हीएफ सेंटरची चौकशी सुरू

बदलापूर, दि.४,प्रतिनिधी:बदलापूर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील बीजांड काढून त्याची बेकायदेशीर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून पोलिस आणि आरोग्य विभागाने तपासाची व्याप्ती वाढवली आहे.
प्राथमिक तपासानुसार दलाल महिलांनी २५ ते ३० हजार रुपयांचे आमिष दाखवून त्यांना इंजेक्शन देत आणि त्यानंतर त्यांची बीजांडे काढण्यासाठी आयव्हीएफ केंद्रात पाठवत होते. काही महिलांकडून ही प्रक्रिया अनेक वेळा करून घेतल्याचेही समोर आले आहे.

घरातूनच चालत होता रॅकेट
बदलापूर पूर्व पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर जोवेली परिसरातील एका घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत बीजांड वाढीसाठी वापरली जाणारी इंजेक्शन्स, कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे जप्त करण्यात आले. या प्रकरणात तीन महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत महिलांना आयव्हीएफ केंद्रांशी कनेक्शन असल्याचा आरोप आहे.

अनेक महिलांचे शोषण; राज्याबाहेरही धागेदोरे
तपासादरम्यान किमान ४० महिलांचे शोषण झाल्याची माहिती समोर आली असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या रॅकेटचे धागेदोरे नाशिकसह इतर राज्यांपर्यंत पोहोचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

राज्य सरकारची कडक भूमिका
या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने राज्यातील सुमारे ८६० आयव्हीएफ केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित डॉक्टर आणि केंद्रांवर कठोर कारवाई केली जाणार असून परवाने रद्द करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पीडित महिलांच्या आरोग्य तपासणीसह त्यांना वैद्यकीय मदत देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आधारकार्ड पडताळणी आणि नोंदणी प्रक्रिया अधिक कडक करण्याचा विचार शासनाकडून सुरू आहे.

नाशिकचा डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात
बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या अवैध स्त्रीबीज (अंडाणू) विक्री प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत नाशिक येथील मालती आयव्हीएफ सेंटरचे संचालक डॉ. अमोल पाटील यांना अटक केली आहे. बदलापूर पोलिसांनी मंगळवारी रात्री ही कारवाई केली असून या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या सहावर पोहोचली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *