जनतेचे सेवक आहोत याची सर्वसामान्यांना प्रचिती देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा प्रारंभ
लोककल्याणकारी उपक्रमासाठी प्रशासनाने उत्स्फूर्त पुढाकार घ्यावा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
१५ पेक्षा जास्त प्रमुख सेवा थेट शिबीर स्थळी देण्याचे उद्दिष्ट
नागपूर, दि. ७ :- राज्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला महसूल विभागाशी असलेल्या सेवा तत्परतेने मिळाव्यात, तहसील कार्यालयात गावपातळीवरील खेटे मारण्याची वेळ येवू नये या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ आजपासून सुरु झाले. प्रत्येक तालुका पातळीवर आयोजित या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी हे या अभियानाच्या माध्यमातून आपण जनतेचे सेवक आहोत याची प्रचिती सर्वसामान्य नागरिकांना देतील असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त करून या अभियानाला शुभेच्छा दिल्या. राज्यातील सर्व महसूल मंडळे तसेच नगरपालिका, नगरपंचायतीच्या क्षेत्रात पुढच्या तीन महिन्यात सहा दिवस अभियान घेतले जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांसाठी असलेल्या महसूल विभागातील महत्वाच्या १५ स्वरुपातील सेवा एकाच ठिकाणी एकाच दिवसात मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. याच्या प्रभावीअंमलबजावणीसाठी राज्यपातळीवर आढावा बैठका घेऊन समित्या नेमल्या. हे अभियान प्रशासनाच्या लोकाभिमुखतेचे एक नवे मापदंड ठरेल असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. १५ पेक्षा जास्त प्रमुख सेवा थेट शिबीर स्थळी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
अभियानाचे वेळापत्रक
मार्च महिन्यातील शिबिरे: ७ मार्च (शनिवार) आणि १४ मार्च (शनिवार).
एप्रिल महिन्यातील शिबिरे: १० एप्रिल (शुक्रवार) आणि १७ एप्रिल (शुक्रवार).
मे महिन्यात नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावर शिबिरे: ८ मे (शुक्रवार) आणि १५ मे (शुक्रवार)
सावनेर तालुक्यात पाटणसावंगी ग्राम पंचायत कार्यालय येथे आमदार डॉ. आशिष देशमूख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीर घेण्यात आले. शासनाच्या विविध योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना मिळावा यासाठी हे शिबीर व अभियान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगीतले. तुकडेबंदी संदर्भातील धोरण, अकृषक आकारणी संदर्भातील धोरणात केलेल्या बदलाबाबत उपस्थित नागरीकांना त्यांनी माहिती दिली. या शिबीराचे माध्यमातून गाव पातळी वरील लोकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याबाबत त्यांनी आवाहन केले.
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आयोजित शिबिरात विविध विभागामार्फत स्टॉल लावण्यात येवून नागरीकांच्या तक्रारी व अडचणीचे निराकरण करण्यात आले. शासनाचे विविध योजने बाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.




