नागपूर मध्ये १० ते २३ मार्च रोजी राज्यस्तरीय “महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शन २०२६” चे आयोजन – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, दि.७ : नागपूर येथे राज्यस्तरीय “महालक्षमी सरस २०२६” वस्तू व विक्री प्रदर्शनाचे आयोजन दि. १० ते २३ मार्च २०२६ दरम्यान रेशीमबाग मैदान, नागपूर येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूरकरांनी आणि परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देवून विविध उत्पादनांची खरेदी, सर्व प्रकारच्या खाद्यसंकृतीचा आस्वाद आणि नामवंत सांस्कृतिक कलाकारांचा कलेचा आनंद घ्यावा असे आवाहन मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.
महालक्ष्मी सरस मध्ये एकूण ३७० स्टॉल असतील यामध्ये १०० खाद्यपदार्थांचे व २७० इतर स्टॉल्स असतील अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समुहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या करीता राज्यस्तरावर, विभागस्तरावर आणि जिल्हास्तरावर प्रदर्शनींचे आयोजन करण्यात येते. सन २००४ पासून ग्राम विकास विभागातंर्गत मुंबई येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शना चे आयोजन करण्यात येते. देश पातळीवर प्रत्येक राज्यात विक्री व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, राज्यातील ग्रामीण भागातील महिला आर्थिक व सामाजिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याकरीता सन २०११ पासून ग्राम विकास विभागातंर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची ३४ जिल्ह्यातील ३५१ तालूक्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वयं सहाय्यता समुहातील महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून त्यांना यशस्वी उद्योजिका म्हणून नवीन ओळख निर्माण करण्याची संधी निर्माण देण्यात येत आहे. अभियानातंर्गत ३ लाख पेक्षा जास्त महिला उद्योजिका राज्यभरात निर्माण केल्या आहेत असे ते म्हणाले.
ग्रामीण भागातील महिला या पारंपारिक व अपांरपारिक अशा शेती आधारीत व बिगर शेती आधारीत व्यवसायाशी जोडल्या गेलेल्या आहेत. अभियानातील बहुतांशी महिलांनी यशस्वी उद्योजिका म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केलेले आहे व विविध उत्पादनांची निर्मीती करत लखपती दीदी होण्याचा बहुमान मिळवत आहेत.
महालक्ष्मी सरस प्रदर्शनीचा मुख्य उद्देश देशातील व राज्यातील स्वयं सहाय्यता समुहांतील महिलांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलव्ध करुन देणे हा आहे. याचबरोबर समुहांतील सदस्यांना विविध राज्यातील उत्पादने, विक्री व बाजारपेठेची माहिती देणे व राज्या- राज्यातील लोकांचे राहणीमान, खाद्यसंस्कृती व कलाकुसर इ. चा परस्परांना परिचय करुन देणे असा उद्देश आहे. शहरी भागातील लोकांना अस्सल देशी-गावराण वस्तू/पदार्थ प्रदर्शनाद्वारे उपलव्ध करुन देण्यात येत आहेत.
नागपूर येथील सरस च्या आयोजनामुळे विदर्भातील स्वयं सहाय्यता गटांना बाजापेठ उपलब्ध होण्यासाठी व त्यांच्या उत्पादकतेला तसेच व्यावसायिकतेला चालना मिळण्यासाठी मोठी मदत होणार आहे. महालक्षमी सरस हा आता विश्वासार्हतेचा ब्रान्ड झाला आहे. या प्रदर्शनातून गुणवत्ता, दर्जा आणि शुद्धता त्याचबरोबर वाजवी दर यासाठी उमेद अभियानाकडून बारकाईने कार्यवाही केली जाते.




