नागपूर जिल्हा भिवापुर

जागतिक महिला दिन निमित्य खास लेख : महिला सक्षमीकरणाचे कायदे व वास्तविक जिवनातील आव्हान

धनश्री मिरे
संचालिका, ग्लोब योग असोसिएशन

सकाळच्या कपभर चहाचा आनंद
रोजच्या प्रमाणे आजही माझ्या दिवसाची सुरुवात एक कपभर चहाच्या प्याल्याने झाली. हीच वेळ माझ्यासाठी अगदी सुखदाई आणि एकांत अनुभव देणारी असते. चिवचिव करणाऱ्या चिमण्यांचा आवाज आणि आईने अंगणात शिंपलेल्या सड्यामुळे येणारा ओल्या मातीचा सुगंध मनात अनेक विचारांना प्रेरणा देतो. मी, एक स्त्री – आईबाबांची लाडकी आणि कुणाची तरी अर्धांगिनी. चहाचा एक घोट घेताच विचार कसे वाढायला लागतात. आईच्या कुशीतून कुणाच्या तरी घराच्या अंगणातील तुळस बनण्याचा प्रत्येक स्त्रीचा प्रवास किती वेगळा असतो ना! कुणाचा अगदी मनासारखा तर कुणाचा नदीतील डोहासारखा. कुणापासून शिकण्यासारखा तर कुणाला शिकवण्यासारखा. प्रत्येक स्त्रीचा अनुभव अगदी वेगळा असतो.
यत्र नार्यस्तु पूज्यते, रमन्ते तत्र देवताः
ज्या देशात संस्कृतीने भरलेले प्रत्येक कार्यांची सुरुवात “श्री गणेश” जींच्या नावाने केली जाते, त्या देशात स्त्रियांना देखील पूजनीय मानले जाते. आणि त्याच ठिकाणी देवही वास करतो, हे आपण विसरतो. भावनिक पैलूपासून दूर जात वास्तवावर बोलूया. जर आपण “महिला सक्षमीकरण” या शब्दाची व्याख्या समजून घेतली तर आपल्याला कळेल की महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांची सामाजिक, आर्थिक आणि स्वतःच्या स्थितीमध्ये सुधार आणणे होय. ज्याद्वारे आपण महिलांना शिक्षण, रोजगार, सन्मान, समान हक्क, अधिकार आणि आर्थिक प्रगती या सर्व गोष्टींमध्ये सक्षम बनविण्याचे निर्णय घेऊ शकतो. पण केवळ ही व्याख्या समजून घेणे ही मोठी गोष्ट नव्हे तर अश्या पुरुषप्रधान देशातील महिलांसाठी या सर्व गोष्टींचा काही अर्थ असेल आणि त्यांची अंमलबजावणी होईल तेव्हा ती मोठी गोष्ट ठरेल.

महिला सक्षमीकरणाचे कायदे

आजही जर विवाहित किंवा अविवाहित महिला नोकरी करत असेल तर त्या महिलांच्या पगारात पुरुषांच्या तुलनेत मोठी तफावत असते. याचे कारण म्हणजे हेच की महिलांचे संगोपन तर त्यांचे पती किंवा कुटुंबातील सदस्यच करतात. हे तर एक छोटेसे उदाहरण आहे, परंतु अश्या बऱ्याच गोष्टींमध्ये फरक कमी करण्यासाठी भारत सरकारने काही कायदे अमलात आणले आहेत. क्वचितच काही महिलांना याची माहिती असेल:
अनैतिक आचरण (अधिनियम १९५६)
हुंडाबंदी (अधिनियम १९६१)
समान कामगार कायदा (१९७६)
मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा (१९८७)
लिंग चाचणी तंत्र कायदा (१९९४)
बालविवाह प्रतिबंधक कायदा (२००६)
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा (२०१३)
महिलांना स्वत:च्या सक्षमीकरणासाठी स्वतःच पुढे यावे लागेल. त्यांना स्वतःच सर्व कामे आणि योजनांची माहिती ठेवावी लागेल, तरच महिला सक्षमीकरण प्रत्यक्षात साकार होईल. महिला सशक्तीकरण आपल्या समाजाला आणि राष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकतो, जिथे खरे तर स्त्री आणि पुरुष दोघेही समान हक्क आणि सन्मानाने जगू शकतात.

वास्तविक जीवनातील आव्हाने

आजचा काळ काही वेगळाच अनुभव देतो आहे. महिलांना, मुलींना स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देण्या ऐवजी, योग व्यायाम किंवा काही कलाकृतीमध्ये सहभागी होण्याऐवजी, स्वावलंबी होण्याऐवजी फक्त आपले पती, मुले-बाळे, दिखावा, साज-शृंगार, अंगप्रदर्शन, सोशल मीडिया ,आणि वेळ व्यर्थ घालविण्यात जास्त वेळ देण्यात लागले आहेत. अश्या परिस्थितीत त्यांना आपल्या जीवनात काही खास, काही वेगळे करण्याचा विचार कसा येईल? नारीवाद आणि महिला आरक्षण दोन्ही वेगळ्या बाजु आहेत आणि आपन दोन्ही मिळविण्याची अपेक्षा करतो , स्त्री पुरुष समानता पण हवी आहे आणि महिला आरक्षण देखील हवे आहेत ,कश्या करीता ? समान अधिकार आणि सम्मान मिळविण्याकरिता हिम्मत हवि असते सांत्वना नाही.

महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश

शेवटी सर्व महिलांना एवढाच संदेश द्यायचा आहे की स्वतःला अश्या एका उंच शिखरावर पोहोचविण्याचा प्रयत्न करा, की ज्या पातळीला पोहोचून आपण आपल्या आई-वडिलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करू शकू आणि आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांना शक्य तितका आनंद देऊ शकू, एक तरी अनाथ मुलांचे जीवन बनवू शकू. महिलांना स्वतःच्या परिस्थितीत सुधार आणायचा असेल तर पती, मुले-बाळे, दिखावा, साज-शृंगार, अंगप्रदर्शन, सोशल मीडिया, भावनात्मक गोष्टीपासून थोडे दूर जावे लागेल, आणि वास्तववादी जीवनाला सुरुवात करावी लागेल. शिक्षण, कौशल्य आणि स्वतःच्या कुशलतेला ओळखावे लागेल. आपल्या जीवनात काहीतरी वेगळे किंवा खास करावे लागेल म्हणजे आपल्याला “महिला दिवस” असा वेगळा साजरा करण्याची गरज नसणार.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *