क्रीडा टॉप स्टोरी

भारत विश्वविजेता

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला. संजू सॅमसनच्या ८९ धावा आणि इशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५ बाद २५५ धावांचा विक्रमी डोंगर उभा केला, ज्यासमोर न्यूझीलंडचा डाव अक्षरशः कोलमडला.

२५६ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. न्यूझीलंड २० षटकांत केवळ १५९ धावा करू शकली आणि भारताने ९६ धावांनी विजय मिळवत विश्वचषकावर तिसऱ्यांदा नाव कोरले.

त्यापूर्वी भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला. विश्वचषक फायनलच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आणि भारताने विजयासाठी किवींसमोर १२.७५ च्या सरासरीने धावांचे आव्हान ठेवले होते.

टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने वादळी सुरुवात केली. संपूर्ण स्पर्धेत धावांच्या शोधात असलेल्या अभिषेक शर्माने सर्वात मोठ्या व्यासपीठावर आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली. अभिषेक आणि संजू सॅमसन या जोडीने पहिल्या विकेटसाठी ५० हून अधिक धावांची भागीदारी करत विश्वचषकाच्या फायनलमधील १७ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडीत काढला.

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही संघाच्या सलामीवीरांना फायनलमध्ये ५० धावांची भागीदारी करता आली नव्हती. २००९ मध्ये पाकिस्तानच्या कामरान अकमल आणि शाहजेब हसन यांनी श्रीलंकेविरुद्ध ४८ धावांची भागीदारी केली होती. अभिषेक आणि संजूने हा १७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत नवा कीर्तिमान प्रस्थापित केला आहे.

भारतातर्फे संजू सॅमसनने ८९, अभिषेक शर्माने ५२, इशान किशनने ५४, हार्दिकने १८ तर शिवम दुबेने २६ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव फक्त शून्यावर बाद झाला.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांसमोर न्यूझीलंडचा डाव अक्षरशः कोलमडला. जसप्रीत बुमराहने ४, अक्षर पटेलने ३, हार्दिक पंड्या, अभिषेक शर्मा आणि वरुणने १-१ बळी घेतले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *