पाटणा, दि. ८ वृत्तसंस्था:बिहारच्या राजकारणात आता मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांचे ५० वर्षीय सुपुत्र निशांत कुमार यांनी आज अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला. नितीश कुमार गेल्या दोन दशकांपासून राज्याचे नेतृत्व केल्यानंतर आता राज्यसभेवर जाण्याच्या तयारीत असतानाच निशांत यांचा हा राजकीय प्रवास सुरू होत आहे. बिहारमधील विकासकामामुळे ‘सुशासन बाबू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ७५ वर्षीय नितीश कुमार यांनी १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, ते लवकरच मुख्यमंत्रीपद सोडण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार यांनी पद सोडल्यानंतर आणि वरिष्ठ सभागृहात गेल्यानंतर, भाजप-जेडीयू सरकारमध्ये निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती होऊ शकते, अशी चर्चा आहे. तसेच, बिहारमध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री होण्याची चिन्हे आहेत.
“सक्रिय सदस्याच्या रूपाने मी पक्षाची देखभाल करेन. माझ्या वडिलांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला असून तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मी नितीश कुमारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेन. पक्षाने आणि जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्या वडिलांनी गेल्या २० वर्षात जे केलंय, ते मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन”, असं निशांत कुमार म्हणाले.




