वर्धा

अल्पवयीन युवतीशी अशोभनीय वर्तन: राष्ट्रवादीचे नेते दिवाकर गमे यांच्यावर गुन्हा दाखल

पुलगाव पोलिसांची कारवाई ,पॉक्सोसह विविध कलमांखाली अटक

वर्धा:जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे प्रदेश उपाध्यक्ष व वरिष्ठ समाजसेवक दिवाकर गमे (७८) यांच्याविरुद्ध पुलगाव पोलिसांनी पॉक्सो व विनयभंगासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. नोकरीचे आमिष दाखवून पीडित युवतीशी अनेक वर्षे अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, दिवाकर गमे यांची हिंगणघाट तालुक्यात शैक्षणिक संस्था असून ते अनेक वर्षांपासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेसोबत कार्यरत आहेत. सध्या ते या संघटनेचे विदर्भ अध्यक्ष आहेत. तसेच ते महाज्योतीचे माजी संचालकही राहिलेले आहेत. सामाजिक व राजकीय क्षेत्रात ओळख असलेल्या व्यक्तीवर असे गंभीर आरोप झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी २१ वर्षीय युवतीने पुलगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी हिंगणघाट येथील मारोती वॉर्डचे राहिवासी दिवाकर गमे यांच्या विरोधात पॉक्सो व विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. शनिवारी त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेले करत आहेत.

पीडितेच्या कुटुंबाशी होती ओळख

आरोपीची पीडितेच्या कुटुंबाशी चांगली ओळख असल्याचे समोर आले आहे. प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने कुटुंबाने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. पीडितेला आपल्या संस्थेत नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले. पीडितेने बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर नीट परीक्षेच्या कोचिंगच्या बहाण्याने आरोपी तिला नाशिक येथे घेऊन गेला होता. कुटुंबाचा आरोपीवर विश्वास असल्याने पीडिता त्याच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करत होती. २०२१ पासून आरोपी तिला त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मोबाईलमध्ये आढळले अश्लील संदेश

आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून गेल्या काही महिन्यांपासून पीडितेने त्याच्याशी संपर्क टाळण्याचा प्रयत्न केला. तरीही आरोपी वारंवार फोन करून मोबाईलवर अश्लील संदेश व व्हिडिओ पाठवत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यात काही आक्षेपार्ह मजकूर आढळल्याची माहिती मिळाली आहे. पीडितेने पोलिसांसमोर अनेक गंभीर खुलासे केले असून पोलिस या प्रकरणातील पुरावे गोळा करत पुढील तपास करत आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *