बदलापूर, दि.९,प्रतिनिधी:कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या स्थायी समितीने सन 2025-26 चा सुधारीत तसेच सन 2026-27 चा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करून नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी सोमवारी दि.9 मार्च झालेल्या सर्वसाधारण सभेत सादर केला. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात कोणतीही नवीन करवाढ सुचविण्यात आलेली नाही.
सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानुसार प्रारंभिक शिल्लक 14,211.88 लाख रुपये असून एकूण महसुली जमा 25,823.49 लाख रुपये आणि भांडवली जमा 63,226.55 लाख रुपये आहे. तसेच असाधारण लेखे (जमा) 6,625.75 लाख रुपये आहेत. यानुसार एकूण जमा 1,09,887.67 लाख रुपये इतकी आहे.
खर्चाच्या बाबतीत महसुली खर्च 33,345.32 लाख रुपये, भांडवली खर्च 69,905.25 लाख रुपये आणि असाधारण खर्च 6,625.34 लाख रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे. एकूण खर्च 1,09,875.91 लाख रुपये असून सन 2026-27 साठी 11.76 लाख रुपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.
नगरपरिषदेचे अंदाजित स्वउत्पन्न 24,723.47 लाख रुपये असून बांधील खर्च 33,954.83 लाख रुपये इतका आहे. विविध योजनांसाठी अंदाजे 2,973.16 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पात महिला व बालकल्याणासाठी 350 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले असून गर्भसंस्कार उपक्रम, महिलांसाठी स्व-रोजगार प्रशिक्षण, आरोग्य शिबिरे तसेच नगर कन्या सन्मान योजना राबविण्यात येणार आहेत. शिक्षण क्षेत्रासाठी 186.50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून नगरपरिषद शाळांची दुरुस्ती, कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती, एरंजाड व माणकिवली येथे शाळांचा विस्तार तसेच विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य व गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शहरातील क्रीडांगणे, उद्याने आणि बालोद्यानांचा विकास, व्हर्टिकल गार्डन, बॉटॅनिकल गार्डन तसेच मल्टिपर्पज गार्डन उभारण्याचा प्रस्तावही अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. विकास आराखड्यातील आरक्षणाच्या जागा ताब्यात घेऊन अतिक्रमणापासून संरक्षण करण्यावरही भर देण्यात येणार आहे.
तसेच बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांची उभारणी, आगरी भवन, सुसज्ज नाट्यगृह, सांस्कृतिक भवन आणि एबीसी
(Animal Birth Control) सेंटर उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. भुयारी गटार योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी शासनस्तरावर मंजुरी व निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता रस्ते, पायवाटा, वाहतूक व्यवस्थेसाठी सिग्नल यंत्रणा, सांडपाणी व्यवस्थापन तसेच पाणीपुरवठा सुधारण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सहकार्याने नवीन पाणीपुरवठा जाळे विकसित करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. नगरपरिषदेने नागरिकांना मालमत्ता कर वेळेवर भरून शहराच्या विकासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.




