नेपाळमधील राजेशाही संपून लोकशाही आली. या लोकशाहीत नेपाळला जो अनुभव आला तो राजेशाही पेक्षाही भयानक होता. दरवर्षी कडबोळे सरकार सत्तेवर येत होते. डावे प्रचंड असोत किंवा अतिडावे ओली असोत किंवा काँग्रेसचे देउबा असोत. हे सर्व जनतेला प्रचंड ‘ओली’ करून देउबा ऐवजी ‘घेऊबा’ झाले होते.
जनतेला काही द्यायचेच नाही; जे काही द्यायचे असेल ते आपल्या पोराबाळांना आणि आपल्या कुटुंबीयांनाच द्यायचे. नेपाळमधील चीनवादी डावे आपल्या पोराबाळांसाठी संपत्तीचे इमले बांधत होते, नेपाळमधील जनता खड्ड्यात जात होती. पुढार्यांचे दिवटे मात्र मोठमोठी फी भरून परदेशात मोठ्या विद्यापीठांत शिकत होते. ज्या देशाने राजेशाही संपवली, त्या देशातील लोकशाही रडत होती. या लहानशा देशाने म्हणजेच नेपाळने जे सत्ताधारी निवडले ते फक्त आपला आणि आपल्या कुटुंबाचा प्रतिपाळ करीत होते.
अखेर या देशातील दबून राहिलेला प्रचंड असंतोष तरुणाईद्वारे प्रकट झाला. एका ३५ वर्षांच्या काठमांडूच्या माजी महापौरांच्या नेतृत्वात तत्कालीन पंतप्रधान ओली यांची अशी काही ‘ओली’ केली गेली की, त्यांच्यापेक्षा या ३५ वर्षांच्या बालेन शाह यांनी चौपट मते घेऊन ओली यांना पार पाताळात पाठवले.
काही महिन्यांपूर्वी नेपाळमध्ये तरुणांचे आंदोलन होते काय, सत्ताधार्यांना पदे सोडून पळावे लागते काय, त्यानंतर नवीन निवडणुकीची घोषणा होते काय आणि तीन-चार महिन्यांच्या नव्या पक्षाला प्रचंड विजय मिळतो काय! हे सर्व नेपाळच्या तरुणाईने, त्यांच्या मतदार असलेल्या हितचिंतकांनी आणि कुटुंबीयांनी करून दाखवले आहे. ओली यांचा झालेला पराभव त्यांच्यासाठी लाजीरवाणाच आहे. या चीनधार्जिण्या ओलींनी भारताशी कधीच मैत्रीचे संबंध ठेवले नाहीत. त्यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळला दोन आकडी सदस्यही निवडून आणता आलेले नाहीत. दुसऱ्याही कम्युनिस्ट पक्षाची तीच स्थिती आहे.
त्यातल्या त्यात नेपाळ काँग्रेस बऱ्या स्थितीत आहे. युवा वर्गाने मात्र या नव्या नेत्याच्या पक्षाला भरभरून मते दिलेली आहेत. सरकार पक्षाचे आदेश लष्कर, निमलष्कर किंवा पोलीस यांनी मानले नाहीत म्हणूनच ओलींना पळावे लागले. आता या देशात ३५ वर्षांच्या बालेन शाह यांना पंतप्रधानपद मिळणार आहे ज्यांचे सरकार एकपक्षीय राहणार आहे.
नेपाळमधील बेरोजगारी आणि सरकारमधील भ्रष्टाचार व सावळा गोंधळ यामुळे जनतेने केलेल्या उठावाला नवे सरकार कसे सामोरे जाते, हे भविष्यात बघावे लागेल. हा नवा राजकर्ता चीन किंवा भारत यांपैकी कोणाचाही अंतरंग मित्र नाही, यातच नेपाळ अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या सर्व समस्या एका दमात सुटणार नाहीत, किमान त्या दृष्टीने काही प्रयत्न होतो आहे हे दिसले तरी तरुणांना हायसे वाटेल.
भारत आणि नेपाळ यांचे व्यापारी संबंध फार जुने आहेत. भारतातून आयात करणे सोयीचे आणि सोपे आहे म्हणूनच नेपाळच्या एकूण आयातीमध्ये भारताचा हिस्सा ६० टक्क्यांहून जास्त आहे. भारत आणि नेपाळ शेजारी असल्यामुळे सीमावाद आहे, पण या किरकोळ सीमावादाचा बाऊ करून नवे राजकर्ते भारताशी शत्रुत्व ठेवणार नाहीत असे वाटते. भारत आणि नेपाळ यांच्यात पासपोर्टशिवाय ये-जा करता येते. तेथील पशुपतीनाथ मंदिर भारतातही भक्तीभावाने आणि आस्थेने पूजले जाते. प्रभू श्रीरामांची सासुरवाडी नेपाळमध्येच आहे, ज्यामुळे भारतानेही उदार मनाने नेपाळला मदत केली पाहिजे. भारत आणि नेपाळ न भांडणारे सख्खे भाऊ आहेत हे सर्वांना दाखवून दिले पाहिजे.
नेपाळच्या तरुण पंतप्रधानांना मार्गदर्शनही केले पाहिजे कारण त्यांचे शिक्षण भारतातच झालेले आहे. यामुळे या दोन्ही देशांतील मैत्री घट्ट होईल, अशी पावले उचलली गेली पाहिजेत आणि नेपाळला आपला पक्का मित्र केला पाहिजे. नेपाळमधील नव्या सरकारचे स्वागत आणि अभिनंदन…!!!




