अकोट अकोला जिल्हा

मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन रेणूका केकन बनली आयएएस

जिद्द,मेहनत आणि संस्कारांचा अभिमानास्पद विजय

कु.चंचल पितांबरवलेअकोट : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पास्टूल गावची कन्या कु.रेणूका दिनेश केकन हिने अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या यूपीएससी (UPSC) परीक्षेत यश मिळवत आयएएस (IAS) होण्याचा मान मिळवला आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून,मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या रेणूकाने आपल्या जिद्दी,परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर हा ऐतिहासिक टप्पा गाठत संपूर्ण जिल्ह्याचा आणि राज्याचा अभिमान वाढवला आहे.रेणूका केकन हिची आई शोभा केकन या साध्या कुटुंबातील असून कुटुंबाने शिक्षणाला दिलेले महत्त्व आणि संस्कार यामुळेच रेणूकाने आज हे मोठे यश संपादन केले आहे. तिचे मूळ गाव पास्टूल (ता. पातूर,जि.अकोला) असून अत्यंत साध्या परिस्थितीतून शिक्षण घेत तिने देशातील सर्वात कठीण मानली जाणारी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

रेणूकाचे प्राथमिक शिक्षण१ ली ते ३ री पर्यंत स्थानिक उच्च शिक्षण प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर ४ थी चे शिक्षण तिने सरस्वती विद्यालय,अकोट येथे पूर्ण केले.पुढे५वी ते१२वी पर्यंतचे शिक्षण तिने तूळसाबाई कावल विद्यालय,पातूर येथे घेतले. ग्रामीण भागातील मराठी माध्यमातील शिक्षणातूनही मोठी स्वप्ने पूर्ण होऊ शकतात,हे तिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले.उच्च शिक्षणासाठी रेणूकाने पुण्यातील नामांकित फरग्युसन महाविद्यालय, पुणे येथे बी.ए. पदवीचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन काळातच तिने यूपीएससीची तयारी सुरू केली आणि सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि दृढ निश्चय यांच्या बळावर अखेर देशातील प्रतिष्ठित सेवेमध्ये स्थान मिळवले.

आपल्या यशाचे श्रेय देताना रेणूकाने सर्वप्रथम आई-वडिलांचे आशीर्वाद आणि कुटुंबाचा पाठिंबा यांचा उल्लेख केला. विशेषतः अकोट येथील तिचे मामा अरुण काकड यांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करून तिचा आत्मविश्वास वाढवला, असे रेणूकाने सांगितले.त्यांच्या मार्गदर्शनामुळेच योग्य दिशा मिळाली आणि मोठे ध्येय गाठणे शक्य झाले,असेही ती नमूद करते.आजच्या काळात अनेक पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमातील मोठ्या शाळांमध्ये लाखो-कोटी रुपये खर्च करतात. मात्र रेणूकाने मराठी माध्यमातून शिक्षण घेत “जिद्द आणि मेहनत असेल तर माध्यम महत्त्वाचे नसते” हा संदेश समाजासमोर ठामपणे ठेवला आहे. तिच्या यशामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.

रेणूकाच्या या यशामुळे तिचे नातेवाईक,मित्रमंडळी आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पातूर तालुका तसेच अकोला जिल्ह्यात सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामाजिक,शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडूनही तिचे अभिनंदन केले जात आहे.मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन देशातील सर्वोच्च प्रशासकीय सेवेत स्थान मिळवणारी रेणूका केकन ही केवळ एका कुटुंबाचा नाही तर संपूर्ण समाजाचा अभिमान बनली आहे.तिची जिद्द,परिश्रम आणि साधेपणातून घडलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.याचे सर्व श्रेय ती गुरुजन वर्ग व आई आणि वडिलांना देते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *