डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला दीड कोटींचा गंडा;अश्लील संदेश,एन्काऊंटरची भीती दाखवली
बदलापूर,दि.११,प्रतिनिधी:बदलापुरमध्ये एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दीड कोटींची फसवणूक झाल्याची घटना घडली असून डिजिटल अरेस्टचा प्रकार समोर आला आहे.वृत्तपत्रातील बातमी वाचल्यानंतर आपल्याबरोबर घडलेली घटना सारखीच असल्याचे समजताच त्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यानी पोलीस ठाण्यात धाव घेतली.याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला १२ फेब्रुवारी रोजी मोबाईलवर एक कॉल आला होता. तुम्ही मोबाईलवरून ४० महिलांना अश्लील संदेश आणि व्हिडीओ कॉल केले मी मुंबई गुन्हे शाखेतून बोलतो असे सांगत आधारकार्ड व इतर वैयक्तिक माहिती मागितली व पत्नीच्या मोबाईलमध्ये सिग्नल नावाचे एक ऍप डाउनलोड करण्यास सांगून त्याद्वारे बनावट एफआयआर, इंटरपोलची रेड नोटीस, बँकेचे कागदपत्रे आणि विविध आधारकार्डच्या प्रती दाखवल्या. तर फसवणूक करणाऱ्यां आरोपींनी स्वतःला पोलीस अधिकारी, सीबीआय अधिकारी आणि न्यायालयातील न्यायाधीश असल्याचे सांगत त्यांना व्हिडिओ कॉलवर वेळोवेळी भीती दाखवत काही गोष्टी लिहून घेतल्या. एका मनी लॉन्डरिंग प्रकरणात तुम्ही आधारकार्ड, एटीएम कार्ड वापरल्याचे भासवून भीती घातली.यामध्ये त्या व्यक्तीला २५ लाख खात्यावर येतील ते पैसे तुम्हाला सोडून द्यावे लागतील. त्यानंतर ते पैसे पुन्हा तुमच्या खात्यात येतील असेही सांगण्यात आले. मुक्ततेसाठी बँक खात्यावर तब्बल १ कोटी ५६ लाख ४५ हजार पाठवण्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे सर्व खात्यातील पैसे एका खात्यात जमा करून ते पैसे विशिष्ट खात्यात पाठवण्याचे सांगण्यात आले. तसेच घरातील सोन्याबाबत खोटे सांगून सोने गहाण ठेवून १५ लाखही देण्यास भाग पाडण्यात आले.
दरम्यान, त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पैसे परत मिळतील असे आश्वासन देण्यात आले होते. कॉल वर संपर्क साधला असता सुट्टी आहे असे बहाणे सांगितले.यावेळी वर्तमानपत्रात घडलेल्या घटनेची साम्य असलेली बातमी वाचल्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून बदलापूर पूर्व पोलिस अधिक तपास करत आहेत.





