आखातात सुरू असलेल्या इराण आणि इस्राईल अमेरिका यांच्यातील युद्ध आता अजूनच तीव्र झाले आहे. त्याच तीव्रतेने गॅस टंचाईच्या झळा मुंबई, मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात जाणवू लागल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलची तीच अवस्था आहे. गॅसच्या टंचाईचे साईड इफेक्ट्स अनेक व्यवसायांवरती दिसू लागले आहेत. गॅस टंचाईमुळे केटरिंग वाल्यांनी घेतलेल्या हातच्या ऑर्डर सोडून दिलेले आहेत. त्यामुळे लग्न ठरलेल्या अनेक लग्नाळू तरुण-तरुणींची लग्ने सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहेत.
ऐन लग्नसराईच्या दिवसात लग्न सोहळ्यात अडचणी आल्यामुळे जनसामान्यांना याचा तीव्र फटका बसला असून गॅसचे बुकिंग होत नसल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई आणि विदर्भ मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक हॉटेल व्यवसायिकांनी आपली हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्यांना पर्याय नाही त्यांनी पुन्हा लाकडाचे इंधन आणि डिझेलचे स्टोव्ह वापरून या इंधन आणीबाणीच्या काळात स्वतःला तगवून धरलेले आहे. गावागावातील गृहिणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना आणि विदर्भापासून कोल्हापूरपर्यंत आंदोलन सुरू असताना सरकार गप्प का आहे, असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी आज सभागृहात विचारला. बऱ्याच ठिकाणी घरगुती गॅसचा काळाबाजार सुरू असल्याच्या वार्ता येत आहेत त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जागोजागी छापेमारी सुरू झालेली आहे.
सरकारने भाववाढ करूनही गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे जनसामान्यांना आणि गृहिणींना प्रचंड मनस्ताप होत आहे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्यावतीने याचा निषेध करण्यासाठी आज आंदोलन पुकारण्यात आले आहे. बॅचलर्स आणि शिक्षणासाठी पुणे आणि मुंबई या सारख्या ठिकाणी राहणाऱ्या आणि खानावळ तसेच हॉटेल्स वर अवलंबून असणाऱ्या अनेकांना या गॅस टंचाईचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यातच या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात सिलेंडर खरेदी किंवा बुकिंग करू नये असे आवाहन केले आहे, तरीही नागरिकांमधील असंतोष आणि अस्वस्थता कमी होत नाही. त्यामुळे गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत असून या गॅस टंचाईच्या झळा अधिकच तीव्र झाल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे.




