अंबरनाथ , दि . १३ प्रतिनिधी : समाजातील मटका व जुगार यांसारख्या व्यसनांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना १२ एप्रिल १९६९ रोजी करण्यात आली होती. जनतेची फसवणूक थांबवून नियंत्रित पद्धतीने लॉटरी व्यवस्था चालविणे हा या योजनेमागील उद्देश होता.
मात्र अंबरनाथमध्ये या लॉटरीच्या नावाखालीच उघडपणे मटका-जुगाराचा सुळसुळाट सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. या संदर्भात स्थानिक वृत्तपत्रांमधून वारंवार बातम्या प्रसिद्ध होत असूनही उल्हासनगर परिमंडळ ४ च्या पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
अंबरनाथ परिसरात मटका-जुगार अड्डे खुलेआम सुरू असून त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. अधूनमधून पोलिसांकडून कारवाई झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात मोठ्या मटका-जुगार अड्ड्यांवर कठोर कारवाई किंवा ठोस शिक्षा झाल्याचे चित्र दिसत नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कथित संरक्षणामुळेच हा अवैध धंदा बिनधास्त सुरू असल्याची चर्चा रंगत आहे.
या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करतील का, तसेच अंबरनाथमधील मटका-जुगाराचा कायमचा बंदोबस्त करतील का, याकडे आता नागरिकांचे आणि सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे.




