शहरासह तालुक्यात व्यावसायिकांना फटका
तालुक्यात पुढील दोन महिन्यांत हजाराच्या वर लग्नसोहळे
थाळीमागे दहा ते वीस टक्के दरवाढ होणार
लग्नसमारंभ पुढे ढकलण्याची नामुष्की; जादा पैसे मोजूनही तुटवडा कायम
मौदा प्रतिनिधी: आखातातील युद्धामुळे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची टंचाई जाणवू लागली आहे. त्यातच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबवण्यात आल्याने केटरर्स व्यावसायिक अडचणीत आले आहेत. गॅस सिलिंडर वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे काही केटरिंग व्यावसायिकांनी नवीन ऑर्डर घेण्यास नकार दिला आहे. लग्न समारंभाच्या ऑर्डर रद्द होत आहेत. काही लग्न समारंभपुढे ढकलण्याची नामुष्की आली आहे, तर काही ठिकाणी ते साध्या पद्धतीने उरकावे लागणार आहेत.
युद्ध आणखी भडकल्यास त्याचे परिणाम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. युद्धाचा सर्वाधिक परिणाम हा इंधन पुरवठ्यावर होत आहे. आता १९ किलोचे व्यावसायिक सिलिंडर हॉटेल, रेस्टॉरेट किंवा इतर खासगी व्यावसायिक संस्थांना दिले जाणार नाहीत. या सिलिंडरचा पुरवठा केवळ रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांपुरताच (वसतिगृह) मर्यादित करण्यात आला. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका शहर आणि जिल्ह्यातील हॉटेल रेस्टारंट चालक व चहा टपरी चालविणारे अनेक छोट्या व्यावसायिकांना गॅस व छोट्या व्यावसायिकांना बसला आहे. सिलिंडर अभावी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. तर अनेक हॉटेल आणि रेस्टारंट धारकांकडे केवळ दोन दिवस पुरेल एवढाच गॅस सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढे काय असा प्रश्न त्यांच्यासमोर असून यामुळे कामगारांवरसुद्धा गॅस सिलिंडरने संक्रात आणली आहे. काही व्यावसायिकांनी गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून चूल, शेगडी, कोळशावर चालणाऱ्या शेगडीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे,
अवैध वापर रोखण्यासाठी तपासणी..!!!
घरगुती एलपीजी गॅसचा मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक कारणांसाठी अवैध वापर होण्याची भीती आहे. हे रोखण्यासाठी शासनाने ‘मिशन मोड’वर कारवाई सुरू केली आहे. पुरवठा अधिकाऱ्यांना आपापल्या क्षेत्रात गॅस एजन्सींची तपासणी करण्याचे अधिकार शासनाने देण्यात दिले आहेत,
लग्नसराईत कॅटरर्स व्यवसाय धोक्यात..!!!
व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आल्याने ऐन लग्नसराईच्या हंगामात या व्यवसायावर मोठे संकट आले आहे. मात्र अनेकांच्या बुकिंग घेतल्या असल्याने त्यांना लाकडाच्या भट्टीवर सर्व खाद्यपदार्थ तयार करण्याचे नियोजन कॅटरर्सनी केले आहे. विशेष म्हणजे लाकडाचे दरही वाढल्याने पर्यायाने मेन्यू बदलासह दरवाढही होण्याची शक्यता आहे.
लग्न समारंभाच्या आनंदाचा क्षणामध्ये पाहुणे मंडळींचा पाहुणचार करणे क्रमप्राप्त असते. लग्न समारंभासाठी येणाऱ्या पाहुणे मंडळींना स्नेहभोजन केल्याशिवाय जाऊ नये, अशी आग्रहाची विनंती असते, मात्र आता पाहुण्यांना स्नेहभोजनाचा आनंद घेता येईल की नाही हे माहीत नाही.
मदन लेंडे, वराचे वडील ,
आम्हाला दररोज दोन गॅस सिलिंडर लागतात. मात्र, मागच्या दोन दिवसांपासून सिलिंडर मिळत नाही. इंथनाशिवाय हॉटेल चालविणे शक्य नाही. त्यामुळे भट्टीवर जेवढे पदार्थ बनविता येतील, तेच उपलब्ध करून देणार आहोत. सिलिंडर मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.
एक हॉटेल व्यावसायिक




