रासायनिक शेतीतून होणारा भरमसाठ उत्पादन खर्च आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावामुळे निसर्गावरील अवलंबित्व वाढल्याने भारतीय शेतकरी नुकसान आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबला जात आहे. या विदारक परिस्थितीची परिणीती शेतकरी आत्महत्यांमध्ये होत आहे. अशा काळात सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा ध्यास धरणारे अक्षय श्रीकंठवार शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या संयोगाने निसर्गावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत. जमिनीची सुपीकता वाढविणे, उत्पादन वाढविण्यासोबतच शेतीपूरक व्यवसायांतून आर्थिक स्थैर्य कसे प्राप्त करता येईल आणि शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून कसे बाहेर काढता येईल, हे त्यांच्या कार्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यांच्या या संशोधनातून आणि उद्योगातून शेतकरी शेती व्यवसायात नवी भरारी घेईल यात शंका नाही.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी या छोट्याशा गावात अक्षय श्रीकंठवार यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यसेनानी बाबासाहेब देशमुख यांनी या गावात ‘संस्कृती संवर्धन मंडळा’ची स्थापना केली होती. साठ वर्षांपूर्वीच त्यांनी गावात प्रगत शेती आणि ग्रामोत्थानासाठी इस्रायलमधील प्रगत तंत्रज्ञान आणून त्याचे परीक्षण सुरू केले होते. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपारिक पद्धतींचा मेळ घालून जीवामृत, संकरित गाय आणि ठिबक सिंचन यांसारख्या पद्धतींचा वापर करण्यासाठी पोषक वातावरण त्यांनी निर्माण केले. अशा शेतीविषयक वातावरणात वाढलेले अक्षय श्रीकंठवार यांचे वडील स्वतः फिशरी युनिट चालवतात आणि आई शिक्षिका असल्याने अक्षय यांना बालपणापासूनच शेतीची आवड निर्माण झाली.
अक्षय यांनी बी.एस्सी. (केमिस्ट्री) पूर्ण केल्यानंतर ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायतराज’ येथून पदविका प्राप्त केली. परदेशातील शेती पद्धतींचा अभ्यास केल्यानंतर अनुभवासाठी त्यांनी सेंद्रिय शेती आणि न्यूट्रिशन फूडवर काम करणाऱ्या ‘सूर्यमंडल ऑरगॅनिक कृषी व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये नोकरी स्वीकारली. या माध्यमातून त्यांनी विविध भागांत शेतीकामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यानंतर ९० देशांत कार्यरत असलेल्या ‘सिजेंटा फाउंडेशन इंडिया’ या संस्थेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. या संस्थेत काम करताना रासायनिक शेतीमुळे होणारे नुकसान आणि खर्च कसा कमी करावा आणि सेंद्रिय शेतीतून शाश्वत प्रगती कशी साधावी, याचे मोलाचे शिक्षण त्यांना मिळाले. विविध देशांतील तंत्रज्ञानाचा भारतात वापर करणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि जमिनीची सुपीकता वाढवणे यांत त्यांनी मोठे योगदान दिले. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात त्यांनी दोन वर्षे काम केले.
त्यानंतर अक्षय यांना बिल गेट्स यांच्या ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’च्या महत्त्वाच्या प्रकल्पात काम करण्याची संधी मिळाली. या प्रकल्पांतर्गत त्यांनी बिहारमधील ५,००० शेतकरी आणि मध्य प्रदेशातील ५,००० महिलांना शेतीविषयक प्रगत प्रशिक्षण दिले. भारत हा कृषिप्रधान देश असूनही येथील शेतकरी हतबल जीवन जगतो, हे पाहून त्यांचे आयुष्य सुकर व्हावे या प्रेरणेने अक्षय यांनी आपल्या शिक्षणाला अनुभवाची जोड दिली. शेतकऱ्याला समृद्ध व्हायचे असेल तर जमिनीची सुपीकता वाढवणारी आणि कमी खर्चाची शाश्वत सेंद्रिय शेती करणे आवश्यक आहे, हे त्यांनी ओळखले. यासाठी त्यांनी केवळ अत्याधुनिक यंत्रे, इरिगेशन फॅसिलिटीज आणि प्रगत औषधांचा अभ्यासच केला नाही, तर त्यांची भारतात अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शनही सुरू केले.
महागड्या रसायनांमुळे उत्पादन खर्च वाढतो आणि जमिनीचा पोत बिघडतो. हे थांबवण्यासाठी त्यांनी ‘जीवात्मा’ नावाची कंपनी स्थापन केली. जमिनीची सुपीकता वाढवणारी खते आणि ग्राहकांना सकस अन्न मिळावे, हा यामागचा उद्देश होता. यासाठी त्यांनी ५०० थारपारकर गाईंच्या संगोपनासाठी सरकारसोबत करार केला. या गाईंना कोरफड, कढीपत्ता आणि शेवगा यांसारखा नैसर्गिक चारा देऊन त्यापासून उत्तम दर्जाचे दूध, तूप, शेण आणि गोमूत्र मिळवले. या उपपदार्थांपासून शेतीसाठी लागणारी नैसर्गिक औषधे आणि खते तयार केली जातात. यासोबतच शेतकऱ्यांना निर्यातीभिमुख उत्पादन घेता यावे आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळावी, यासाठी ‘दप्तरा ॲग्रीइनोवेशन प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी सुरू केली, ज्याद्वारे रसायनांचा अंश कमीत कमी असलेली उत्पादने पुरवली जातात.
रासायनिक शेतीतून मिळणारे उत्पादन सकस नसल्याने त्यावर प्रक्रिया करून पौष्टिक खाद्यपदार्थ बनवण्यासाठी त्यांनी ‘नेचर न्यूट्री फूड’ ही कंपनी स्थापन केली आहे. यामध्ये ३३ प्रकारचे नैसर्गिक घटकयुक्त खाद्यपदार्थ तयार करून विविध भागांत पुरविले जातात. ‘जीवात्मा’, ‘दप्तरा ॲग्रीइनोवेशन’ आणि ‘नेचर न्यूट्री फूड’ यांच्या माध्यमातून ते जमिनीपासून बाजारपेठेपर्यंतच्या सर्व प्रक्रियेत पारंपारिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. अक्षय यांनी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि काश्मीरमध्ये आपले कार्य विस्तारले असून गुजरात व छत्तीसगडमध्येही त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यांच्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल आज ७० ते ८० कोटींच्या घरात आहे. यासोबतच ‘इंडो ग्लोबल सोशल सर्व्हिस सोसायटी’शी जोडून घेत त्यांनी प्रदूषित नद्यांच्या शुद्धीकरणावर आणि शेतीला शुद्ध पाणी पुरवण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. गहू, मका, हरभरा, मसूर, पालेभाज्या आणि विविध कडधान्यांची निर्यात करून शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.
पारंपारिक पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधून शेतकऱ्यांना शाश्वत शेतीसाठी प्रशिक्षित करणारे अक्षय श्रीकंठवार यांचे उद्यमशील धोरण शेती क्षेत्रासाठी नक्कीच वरदान ठरत आहे. शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांच्याही हितासाठी सुरू असलेल्या त्यांच्या या यशस्वी वाटचालीस अनेक शुभेच्छा!




