उल्हासनगर , दि . ११ प्रतिनिधी : माजी उप महापौर आणि शिवसेना नेत्या जया मोहन साधवानी यांच्या आग्रह खातर उल्हासनगर महानगर पालिकेच्या महा पौर अश्विनी निकम यांनी आज कॅंप पाच मधील विविध भागाचा दौरा करत सर्व उद्याना ची पाहाणी केली. त्यात सध्या चे भाजपा चे उप महापौर अमर लुंड यांच्या प्रभागातील उद्यानाचा ही समावेश होता. महापौरांच्या या दौऱ्यावर मुळे भाजपा चे उपमहापौर अमर लुंड यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते .
महापौर अश्विनी निकम यांनी आज पाहणी दरम्यान श्यामलाल उदासी गार्डन, डॉ. मनु लुधवानी गार्डन, दादा गुरुदास सिंह गार्डन, प्रितम अपार्टमेंट परिसरातील गार्डन, स्वामी शांती प्रकाश चौक परिसर, स्वामी शांती प्रकाश गार्डन (प्रभात गार्डन) तसेच लाल लोई गार्डन या उद्यानांच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली असुन काही ठिकाणी स्वच्छतेचा अभाव, तुटलेली साधने आणि देखभालीअभावी उद्यानांची अवस्था खराब झाल्याचे निदर्शनास आले. तसेच यावेळी राजीव गांधी उद्यान येथे काही गर्दुल्ले दारू पिताना देखील आढळुन आले ,त्यामुळे महापौरांनी उद्यानांच्या सुरक्षेबाबत देखील कडक सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत .
यावेळी जया मोहन साधवानी यांनी महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात या उद्यानांच्या सुशोभीकरण व विकासासाठी महापौर निधीतून १ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली आहे .
दरम्यान, महापौर अश्विनी निकम यांनी या सर्व उद्यानांचे लवकरच सुशोभीकरण करण्यात येईल तसेच नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान उपमहापौर अमर लुंड यांच्या प्रभागात उद्याना ची पाहाणी करताना महापौर सौ निकम यांनी श्री लुंड यांना कोणती ही सूचना अथवा संदेश दिले नाही. तर परस्पर दौरा केल्याने अमर लुंड यांनी महापौर यांचे पती कमलेश निकम यांच्या कडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापौर ह्या संपुर्ण शहराच्या महापौर असून ते कोणत्या ही भागात कधी ही पाहाणी दौरा करू शकतात त्यांना कोणीच रोखू शकत नाही. कमलेश निकम यांनी अमर लुंड यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र महापालिकेत भाजप शिवसेना युती ची सत्ता जरी असली तरी यांच्यातील वाद कायम असल्याचे समजते.




