टॉप स्टोरी महाराष्ट्र

युद्धामुळे कुठलीही कमतरता पडणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, दि. ८ प्रतिनिधी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती ६० रुपयांनी वाढल्या आहेत. येणाऱ्या काळात इंधन तुटवडा निर्माण होईल अशी स्थिती येऊ शकते असे काही माध्यमांनी म्हटले आहे. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, लोकांमध्ये चुकीची माहिती देऊन माध्यमांनी पॅनिक (घबराट) तयार करू नये, भारत सरकारने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातली भूमिका मांडली आहे.

भारताच्या एनर्जी सिक्युरिटीच्या संदर्भात कशाप्रकारे मोदीजींनी पाऊल उचलली आहेत हे आपल्यासमोर आलेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. कमर्शियल एलपीजी गॅसचे दर अचानक १५० ते २०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय पुढे कसा चालवायचा, हा प्रश्न व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. दुसरीकडे घरगुती गॅसच्या दरातही ६० रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घराचे गणित बिघडले आहे. त्यातच, गॅस सप्लायही काही शहरांत बंद पडल्याचे पाहायला मिळते.

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, “मी आपल्या सगळ्यांना सांगतो, लोकांमध्ये पॅनिक तयार करू नका. भारत सरकारने अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. एनर्जी सिक्युरिटी संदर्भात मोदींनी कशी पावले उचलली आहेत हे आपल्या समोर आले आहे. दोन तीन दिवस झाले काही माध्यमांनी चालवून दिले की पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होणार, विनाकारण मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. भारत सरकारने सांगितले की अशी कुठलीही स्थिती निर्माण होणार नाही. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती आहे, जी परिस्थिती उद्भवेल त्याचा सामना करण्यासाठी भारत मोदींच्या नेतृत्वात सक्षमपणे उभा आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *