नवी दिल्ली, दि. १२ वृत्तसंस्था:देशातील एलपीजी (LPG) संकटाबाबत लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, भारत सध्या ४० देशांकडून कच्चे तेल आयात करत आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरबाबत घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
पश्चिम आशियातील संकटावर बोलताना त्यांनी म्हटले की, ऊर्जा क्षेत्राच्या इतिहासात जगाने अशी परिस्थिती यापूर्वी कधी पाहिली नव्हती. होर्मुझ सामुद्रधुनी हा महत्त्वाचा जलमार्ग इतिहासात पहिल्यांदाच व्यावसायिक जहाज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या संघर्षात भारताची कोणतीही भूमिका नसली तरी त्याचे परिणाम भारताला भोगावे लागणार आहेत. मात्र, भारताच्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्याची स्थिती सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उत्पादनात २८ टक्क्यांची वाढ
पुरी यांनी सांगितले की, गेल्या पाच दिवसांत रिफायनरींना दिलेल्या सूचनेनुसार एलपीजी उत्पादनात २८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे आणि पुढील खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता म्हणजे देशातील ३३ कोटी कुटुंबांच्या, विशेषतः गरीब आणि गरजूंच्या स्वयंपाकघरात कोणतीही कमतरता भासू नये. घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून वितरण चक्रात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पर्यायी मार्ग आणि नवीन स्रोत
त्यांनी पुढे सांगितले की, मोठ्या एलएनजी (LNG) मालवाहू जहाजांच्या खेपा दररोज पर्यायी मार्गांनी भारतात पोहोचत आहेत. भारताकडे गॅस उत्पादन व पुरवठ्याची पुरेशी व्यवस्था असल्याने युद्ध दीर्घकाळ चालले तरी परिस्थिती नियंत्रणात राहील. देशातील प्रत्येक घर व उद्योगांसाठी वीज उत्पादनही पूर्णपणे सुरक्षित आहे. आता खरेदीचे स्रोत अधिक विविध केले असून अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, अल्जेरिया आणि रशिया येथून एलएनजी कार्गो मागवले जात आहेत.




