तिपटीने पोषक द्रव्ये वाढविणारी इंडोबायोवेदिक टेक्नॉलॉजी आणि गोविंद जोशींचा शेतकरी सक्षमीकरणाचा ध्यास
आजच्या मुलांसमोर आणि तरुणांसमोर जे ताट वाढले जात आहे, त्यातील अन्नाचे रूपांतर दुर्दैवाने विषामध्ये झाले आहे. या अन्नातील पोषक द्रव्यांच्या कमतरतेमुळे आजचा युवक विशी-तिशीतच बीपी, कॅन्सर, सांधेदुखी, कमकुवत हाडे आणि स्नायू, रोगप्रतिकारशक्तीची कमतरता, थकवा व ॲनिमिया यांसारख्या आजारांनी ग्रस्त आहे. शरीरातील पोषक द्रव्यांची ही कमतरता दूर करण्यासाठी तो मोठ्या प्रमाणात सप्लीमेंट्स घेतो आणि पुन्हा गंभीर परिणामांच्या चक्रात अडकतो. अशा वेळी या तरुणाच्या ताटातील साधारण अन्नच ‘सुपरफूड’ कसे बनवता येईल आणि या तरुणाला गंभीर आरोग्याच्या समस्येतून कसे सोडवता येईल, यासाठी इंडोबायोवेदिक टेक्नॉलॉजीचा वापर करीत जमिनीची सुपीकता वाढवणे, झाडांमधील पोषक द्रव्यांची कमतरता व फंगल इन्फेक्शन कमी करून सकस व भरघोस उत्पादन घेणे आणि शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळवून देणे, या सर्व पातळ्यांवर अहोरात्र काम करणारे गोविंद जोशी शेतकऱ्यांचे केवळ तारणहारच ठरत नाहीत, तर फळ-भाजीपाल्यांमध्ये पोषकता तिपटीने वाढविणारे ‘सुपरफूड मेकर’ ठरले आहेत.
गायनॅकॉलॉजिस्ट असलेली आई आणि शेती व्यवसायात असलेले वडील यांच्या संस्कारांच्या सावलीत गोविंद जोशी नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद गावामध्ये लहानाचे मोठे झाले. शेती व्यवसायात असलेल्या वडिलांना सेंद्रिय शेतीकडे सुरुवातीपासूनच ओढा होता. यातूनच त्यांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे ‘मानस कृषी फार्म’ स्थापन करून देश-विदेशातील सेंद्रिय शेतीवर विविध संशोधन करणाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली. घरातील शेतीविषयक पार्श्वभूमीमुळे आपोआपच गोविंद जोशी यांचा कल शेतीकडे वळला. पाचवी ते बारावीचे शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्ये घेतल्यानंतर त्यांनी अकोला येथून बीएससी ॲग्रीकल्चर केले. आपल्या मुलाच्या या जिद्दीबद्दल आणि कार्याबद्दल गोविंद जोशी यांचे वडील व्यंकटेश जोशी भावुक होऊन म्हणतात, “आम्ही ज्या सेंद्रिय शेतीचे स्वप्न पाहिले होते, त्याला विज्ञानाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन गोविंदने आज खऱ्या अर्थाने पूर्णत्वास नेले आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासोबतच तो माणसांचे आरोग्य जपण्याचे जे कार्य करत आहे, त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.”
बीएससी ॲग्रीकल्चर आणि मानस कृषी फार्ममध्ये करण्यात येणारी संशोधने यातून गोविंद यांच्या लक्षात आले की, बाजारपेठेत सामान्यांना उपलब्ध होणारा भाजीपाला आणि फळे यांच्यातील पोषक द्रव्ये वाढवण्यासाठी काम करणे ही आज काळाची गरज आहे. आणि यातूनच त्यांनी संशोधनावर आधारित ‘सूर्यमंडल ऑर्गनायझेशन’ची स्थापना २०१२ मध्ये केली. या संस्थेअंतर्गत संशोधनांचा आधार घेत त्यांनी ‘इंडोबायोवेदिक टेक्नॉलॉजी’ विकसित केली. ही टेक्नॉलॉजी माती, झाडाची मुळे, पाने, फळ व फुले आणि रोग, कीड, बुरशी या स्तरावर काम करते. “माती जर सशक्त असेल तर झाडांची मुळे सशक्त होतात, परिणामी पाने सशक्त होतात आणि येणारी फळेही सशक्त होतात,” असे दाव्याने सांगणाऱ्या गोविंद जोशी यांचा प्रथम भर जमिनीच्या सुपीकतेवर आहे. झाडांमधील न्यूट्रिशन डेफिशियन्सी, हार्मोनल इम्बॅलन्स आणि फंगल इन्फेक्शन कमी करून झाडांचा मेटाबॉलिजम सुधारला जातो. या तंत्रज्ञानामुळे उत्पादनामधील पोषक द्रव्ये तिप्पटीने वाढली आहेत, असे ते ठामपणे सांगतात.
गोविंद जोशी म्हणतात की, त्यांच्या तंत्रज्ञानाची उत्पादने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात यांसारख्या राज्यांतील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा औषधांवरील खर्च कमी होऊन उत्पादनाची क्वालिटी आणि कॉन्टिटी दोन्ही वाढली आहे. कपाशीचे उत्पादन एकरी १२ ते १५ क्विंटलपर्यंत गेले आहे. सकस उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनावरील मार्गदर्शनासोबतच ते शेतकऱ्यांना पॉलिहाऊस, ड्रोन टेक्नॉलॉजी आणि एआयवर चालणारा ट्रॅक्टर यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. “जमिनीची सुपीकता वाढवली आणि योग्य हमीभाव मिळाला, तर शेतकऱ्याला कर्जमाफीसारख्या बैसाखीची गरज भासणार नाही,” असे ते ठामपणे मांडतात.
आरोग्यमय शेती या ध्येयावर काम करणारे गोविंद जोशी जमिनीची सुपीकता वाढवून सकस उत्पादन मिळवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य हमीभावासाठी शेतकऱ्यांचे एकत्रीकरण या तिन्ही पातळ्यांवर यशस्वीपणे कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या गोविंद जोशी यांच्या प्रयत्नांना सदैव यश लाभो, हीच आमची सदिच्छा.




