तेहरान, दि. १२ वृत्तसंस्था:इराणने अखेर दोन आठवड्यांपासून सुरू असलेला इस्रायल आणि अमेरिकेसोबतचा लष्करी संघर्ष संपवण्याची तयारी दर्शवली आहे. यापूर्वी इराणने ‘आम्ही अमेरिकेसोबत १० वर्षे लढू’ असे सांगितले होते. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील युद्ध लवकरच संपेल असे संकेत दिले होते. आता इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेष्कियान यांनी ट्विट करून “आमच्या तीन मागण्या मान्य झाल्या तर इराण हा संघर्ष थांबवू शकतो” असे सांगितले आहे.
इराणचे राष्ट्रपती मसूद यांनी ट्विट केले की, ‘मी रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी बोललो. इराण या भागात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी कटिबद्ध आहे, हे पुन्हा एकदा सांगितले. हे युद्ध थांबवण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे ज्या झायोनिस्ट सत्तेने आणि अमेरिकेने हे युद्ध सुरू केले आहे, त्यांनी इराणचे कायदेशीर हक्क मान्य करावेत. आम्हाला नुकसान भरपाई द्यावी आणि यापुढे असा हल्ला करणार नाही याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ठोस शाश्वती द्यावी.’
इराणचे प्रवक्ते अबोलफझल यांनी जर वॉशिंग्टनने इराणच्या बंदरांवर हल्ला केला तर पर्शियन गल्फमधील कोणतेही बंदर, आर्थिक केंद्र किंवा कोणतेही लोकेशन आमच्या रडारवर असेल, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर इराणच्या राष्ट्रपतींचा हा युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.
अबोलफझल यांनी “जर आमचे पोर्ट आणि डॉक रडारवर असतील तर या भागातील सर्व बंदरे आणि डॉक आमच्या टार्गेटवर असतील. आम्ही आतापर्यंत जे काही केले आहे त्यापेक्षाही जास्त तीव्रतेचे हल्ले आम्ही करू” अशी धमकी देखील दिली होती.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली अधिकाऱ्यांनी बंद दाराआड चर्चा केली आहे. त्यात त्यांनी इराणसोबत सुरू असलेले युद्ध असंच सुरू ठेवून इराणचे सध्याचे सरकार पाडता येईल याची कोणतीही शाश्वती नाही, असे म्हटले आहे. कारण इतका बॉम्बवर्षाव करून देखील इराणमध्ये सरकारविरुद्ध अजून तरी कोणताही रोष किंवा उठाव दिसत नाहीये.
दुसरीकडे जरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकर संपेल असं वक्तव्य केलं असले, तरी इस्रायलच्या मते अमेरिका लष्करी संघर्ष संपवण्याचे निर्देश देण्याच्या जवळपास देखील नाही. रॉयटर्सने हे वृत्त इस्रायलच्या दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.




