टॉप स्टोरी विदेश

खामेनींच्या हत्येचा बदला घेतल्याशिवाय मागे हटणार नाही – इराणचा निर्धार

तेहरान, दि. ८ वृत्तसंस्था मध्य पूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर परिस्थिती अधिक चिघळली असून इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळांवर आणि मालमत्तेवर हल्ले केल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कठोर इशारा दिला आहे.
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. तसेच या युद्धात आतापर्यंत शेकडो इराणी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर इराणने बदला घेण्याची भूमिका घेतली आहे.

इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांनी सरकारी दूरचित्रवाणीशी बोलताना स्पष्ट इशारा दिला की, “आमच्या नेत्याच्या रक्ताचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे केले त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. त्यांनी आमच्या नेत्याला मारले आणि हजाराहून अधिक लोक शहीद झाले. ही साधी गोष्ट नाही.”

लारीजानी यांनी पुढे सांगितले की, ट्रम्प यांनी इराणच्या प्रतिक्रियेचा चुकीचा अंदाज लावला आहे. “त्यांना वाटले व्हेनेझुएलामध्ये जे घडले ते इराणमध्येही घडेल. पण आता ते स्वतःच या संघर्षात अडकले आहेत. आम्ही ट्रम्पला सोडणार नाही,” असे ते म्हणाले. याचबरोबर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिला की, “जोपर्यंत आम्ही बदला घेत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.”

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *