उल्हासनगर

महिला बचत गटांच्या संघर्षाला अखेर यश; महापौर अश्विनी निकम यांच्या हस्ते लाडक्या बहीणींच्या हातात हक्काचे स्टॉल

उल्हासनगर , दि . ११ प्रतिनिधी : जवळपास एक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर व दीर्घ संघर्षानंतर अखेर महिला बचत गटांच्या लाडक्या बहिणीना त्यांच्या हक्काचे स्टॉल मिळाले आहेत . शिवसेना महापौर अश्विनी निकम व गटनेते अरुण आशान यांच्या हस्ते प्रत्यक्षात स्टॉलच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून महिला बचत गटांचा स्टॉल मिळवण्यासाठी संघर्ष सुरू होता. विविध कारणे व राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासन राजवटीत महिलांना या स्टॉलपासून वंचित राहावे लागले होते.
हा मुद्दा समाजसेवक शिवाजी रगडे यांनी सातत्याने उचलून धरला. महापालिका समोर ठिय्या, तर आमदार कार्यालयावर मोर्चा काढणे अशी विविध प्रकारची आंदोलने करून आणि प्रशासनासमोर ठाम भूमिका घेत त्यांनी हा प्रश्न लावून धरला.
प्रशासन राज संपल्यानंतर लोकप्रतिनिधी सभागृहात आल्यानंतर हा मुद्दा शिवसेना महापौर अश्विनी निकम यांच्यासमोर मांडण्यात आला. त्यावेळी त्यांनी महिलांना शब्द दिला की ८ मार्च महिला दिनानिमित्त स्टॉलचे वाटप करण्यात येईल. आपल्या शब्दावर कायम राहत महिला दिनी औपचारिकरित्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.

यानंतर १० मार्च रोजी महापौरांच्या दालनात महापौर अश्विनी निकम, गटनेते अरुण आशान यांनी हा मुद्दा लाऊन धरणारे शिवाजी रगडे यांच्या उपस्थितीत लाडक्या बहिणींना स्टॉलच्या चाव्यांचे अंतिम वाटप करण्यात आले. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या हातात अखेर त्यांच्या हक्काचे स्टॉल मिळाले. यावेळी सर्व महिलांनी महापौर मॅडमचे आभार व्यक्त केले. याच प्रसंगी नगरसेविका सविता तोरणे रगडे व शिवाजी रगडे यांनी महापौर यांच्याकडे मागणी केली की हा उपक्रम महिलांच्या सबलीकरणासाठी असल्यामुळे स्टॉलचे भाडे रेडीरेकनरनुसार खूप जास्त आहे, त्यामुळे ते रद्द करून महिलांना मोफत स्टॉल देण्याचा प्रस्ताव येणाऱ्या महासभेत आणावा .तेव्हा
महापौर अश्विनी निकम व गटनेते अरुण आशान यांनी ही मागणी मान्य करत येणाऱ्या महासभेत हा मुद्दा मांडण्याचे आश्वासन दिले आहे .
हा मुद्दा सातत्यपूर्ण लाऊन धरून लाडक्या बहीणीना न्याय मिळून दिल्या बद्दल शिवाजी रगडे यांचे महिलांनी विशेष आभार व्यक्त केले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *