डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील ‘सिद्धार्थ’ आता नव्या रूपात; ५०० कोटींच्या निधीतून कायापालट होणार!
विशेष प्रतिनिधी, मुंबई:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक ‘सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालया’साठी राज्य सरकारने ४२ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी महाविद्यालयाला भेट देऊन ही आनंदाची बातमी दिली. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या (PES) राज्यातील १२ महाविद्यालये आणि वसतिगृहांच्या पुनरुज्जीवनासाठी मंत्रिमंडळाने एकूण ५०० कोटी रुपयांच्या निधीवर मोहोर उमटवली आहे.
या निधीच्या माध्यमातून सिद्धार्थ महाविद्यालयाची इमारत आता एका नव्या आणि जागतिक दर्जाच्या रूपात उभी राहणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कोलंबिया विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले, त्या विद्यापीठाच्या वास्तूची प्रतिकृती डोळ्यासमोर ठेवून या महाविद्यालयाचे नूतनीकरण करावे, अशी संकल्पना माजी प्राचार्य डॉ. उमाजी मस्के यांनी मांडली. मंत्र्यांनी या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि समाजकल्याण सचिवांना तात्काळ आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
या भेटीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संजय शिरसाठ यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भावूक होत शिरसाठ म्हणाले, “मी याच संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याने या शाळा-महाविद्यालयांचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे. ५०० कोटींचा निधी मंजूर होऊन त्याचा शासन निर्णय (GR) निर्गमित झाला आहे, त्यामुळे आता विकासकामात कोणतीही अडचण येणार नाही.”
प्रभारी प्राचार्य डॉ. विष्णू भंडारे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, दरवर्षी हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण मिळावे, यासाठी स्मार्ट क्लासरूम्स, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा आणि सेमिनार हॉल यांसारख्या आधुनिक सुविधा या निधीतून उभारल्या जातील.
या निर्णयामुळे बाबासाहेबांच्या शैक्षणिक वारशाला आधुनिकतेची जोड मिळणार असून, यामुळे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजयकुमार बोरसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. समीर ठाकूर यांनी केले.




